Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Aurangabad › जिल्हा बँकेला ९ कोटींचा तोटा

जिल्हा बँकेला ९ कोटींचा तोटा

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 18 2018 12:18AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या वर्षी 12 कोटी 9 लाख रुपयांचा नफा मिळवणारी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मावळत्या आर्थिक वर्षात मात्र 9 कोटी 5 लाखांचा तोटा झाला आहे. बँकेच्या तोट्यासह कर्मचार्‍यांचे रजा रोखीकरण आणि अंधानेर शाखेतील गैरव्यवहारामुळे बँकेची मासिक सभा वादळी ठरली. संचालकांनी प्रशासनावर प्रश्‍नांची सरबत्ती लावत धारेवर धरले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची गुरुवारी (दि. 17) मासिक बैठक पार पडली. यावेळी चेअरमन सुरेश पाटील, उपाध्यक्ष दामोदर नवपुते, आ. संदीपान भुमरे, संचालक किरण पाटील डोणगावकर, अशोक मगर, नंदकिशोर गांधीले, प्रभाकर पालोदकर यांची उपस्थिती होती. डोणगावकर यांनी बँकेच्या नफ्याची माहिती विचारली. व्यवस्थापकीय संचालक राजेश्‍वर कल्याणकर यांनी 2017-18 आर्थिक वर्षात बँकेला 9 कोटी 5 लाखांचा तोटा झाल्याचे यावेळी स्पष्ट केले. गेल्यावर्षी बँकेला 12 कोटी 9 लाखांचा नफा झाला होता. यंदाचा तोटा वगळता बँकेकडे तीन कोटी तीन लाखांचा संचित नफा शिल्‍लक आहे.

अंधानेर वि.का.से. संस्थेच्या 2014-15 आणि 2015-16 आर्थिक वर्षात शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जावरील व्याजाची वसुली चलन पाचवरील बेरीज आणि बँकेत भरलेली रक्‍कम यात 1 लाख 84 हजार 17 रुपयांची तफावत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे तत्कालीन निरीक्षक (भाग चौकसनीस) एन. डी. भदाणे यांच्या निलंबनाची मागणी संचालक मगर यांनी लावून धरली. तसेच तसेच वडनेर इतर तीन शाखांतील कर्मचार्‍यांनी भदाणे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीतही भरारी पथकाला तथ्य आढळल्याचे नमूद केले यानंतर चेअरमन सुरेश पाटील यांनी भदाणे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचे मगर यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या बहुचर्चित सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे श्री रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेला अधिक गती मिळेल. योजना त्वरित कार्यान्वित होण्यासाठी अधिक कसोशीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.