Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विद्युत तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू

औरंगाबाद : विद्युत तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू

Published On: Aug 04 2018 6:15PM | Last Updated: Aug 04 2018 6:15PMअंधारी : प्रतिनिधी 

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शिवारातील अजिज बशीर पटेल  यांच्या शेतातील कपाशी वखरणी करताना विद्युत तार बैलांच्या अंगावर पडल्याने एक बैल मृत्युमुखी पडला तर  एक बैल व मुलगा सुदैवाने वाचले.

ही घटना शनिवारी ( दि.४ ) सकाळी आठच्या सुमारास घडली. अंधारी शिवारात राहणारे अजिज बशीर पटेल यांच्या घरासमोरील शेतात त्यांचा नातू अलीम हा कपाशी वखरणी करत होता. त्याचवेळी शेतातून जाणारी पोलवरील विद्युत तार तुटून अचानक   वखरणी करत असलेल्या बैल जोडीतील एका बैलाच्या अंगावर पडल्याने बैल जागीच मृत्युमुखी पडला.  तर लोखंडी वखर असल्यामुळे त्यात विद्युत प्रवाह उतरला गेल्याने वखर हाकत असलेल्या मुलाला जोराचा शॉक बसल्याने बाजूला फेकला गेल्यामुळे तो सुदैवाने वाचला.  

या घटनेची माहिती पोलिस पाटील दिनेश खराते यांनी तलाठी काथार व महावितरणचे अभियंता प्रदीप निकम यांना दिली.   या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच विजय गोरे यांनी केली आहे.