होमपेज › Aurangabad › उपकुलसचिव मंझा निलंबित

उपकुलसचिव मंझा निलंबित

Published On: Feb 28 2018 2:23AM | Last Updated: Feb 28 2018 2:14AMऔरंगाबाद  ;  प्रतिनिधी

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्‍वरसिंग रायभान मंझा याला मंगळवारी (दि. 27) निलंबित करण्यात आले. मंझावरील गुन्हे आणि कोठडीबाबतचा अहवाल पोलिसांनी तीन दिवसांपूर्वीच विद्यापीठाला सादर केला होता. तथापि, आधी कुलगुरू आणि नंतर कुलसचिव बाहेरगावी असल्यामुळे मंझाचे निलंबन लांबणीवर पडले होते.

कुलसचिव मंगळवारी विद्यापीठात परतताच मंझाच्या निलंबन आदेशावर स्वाक्षरी झाली.  देवनाथ माणिकराव चव्हाण (30, रा. चिकलठाण, ता. कन्नड) आणि कल्याण खिरा राठोड (55, रा. बंगला तांडा, बिडकीन, ता. पैठण) या दोघांनी मंझा याच्याविरुद्ध पोलिसांकडे धाव घेऊन फसवणुकीची फिर्याद नोंदविली होती. मंझाने नोकरीचे आमिष दाखवून देवनाथ चव्हाण यांच्याकडून तीन लाख आणि कल्याण राठोड यांच्याकडून 27 लाख 50 हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर आर्थिक गुन्हे शाखेने मंझाला अटक केली होती.