Fri, Aug 23, 2019 21:24होमपेज › Aurangabad › नारेगावकरांनी पुन्हा झिडकारले

नारेगावकरांनी पुन्हा झिडकारले

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 24 2018 12:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी पुन्हा एकदा नारेगावचा जुना कचरा डेपो खुला करण्याचा प्रयत्न केला. केवळ दहा दिवस जुन्या कचरा डेपोत शहरातील कचरा टाकू द्या, अशी विनंती भापकर यांनी नारेगाव येथील शिष्टमंडळाला केली, परंतु गावकर्‍यांनी ही विनंती स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी सायंकाळी शहरातील कचराप्रश्‍नावर तातडीची बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, हेमंत कोल्हे उपस्थित होते. या बैठकीला नारेगाव पंचक्रोशीतील नागरिकांच्या शिष्टमंडळाला बोलाविण्यात आले होते. 

मनपाकडून ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्टग पीटच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मशीन खरेदीची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र सध्या शहरात ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला आहे. त्यामुळे किमान दहा दिवस शहरात साठलेला कचरा नारेगाव डेपोत टाकू द्या, अशी विनंती भापकर यांनी नारेगावच्या शिष्टमंडळाकडे केली, परंतु त्यास या शिष्टमंडळाने नकार दिला. आधीच आम्ही इतकी वर्षे सहन केले. आता पुन्हा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही या गावकर्‍यांनी केला. 

भापकर यांनी डेपोत साठलेला कचरा वर्षभरात प्रक्रिया करून नष्ट करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल, असे गावकर्‍यांना सांगितले. मात्र, गावकर्‍यांनी त्यास आमची हरकत नाही, पण आता नवीन कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. नारेगाव पंचक्रोशीतील शिष्टमंडळात विजय डक, भाऊसाहेब गायके, विष्णू भेसर, सुनील हरणे, रखमाजी गायके, सतीश देवखळे, गणेश गायके, अमोल काकडे, दत्ता भेसर आदींचा समावेश होता. 

Tags : Aurangabad, Attempt, open, old, garbage, depot