Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Aurangabad › विद्यार्थिनीला शाळेत सोडणार्‍या रिक्षाचालकानेच काढली छेड

विद्यार्थिनीला शाळेत सोडणार्‍या रिक्षाचालकानेच काढली छेड

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 1:08AMऔरंगाबाद : मोबाइलवर फोन करून मला भेटत जा, माझ्याशी बोलत जा असे म्हणत दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या रिक्षाचालकाची रवानगी न्यायालयाने हर्सूल कारागृहात केली. शशी राजेंद्र दानवे (30, रा. विष्णूनगर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने काही महिन्यांपूर्वीच दहावीची परीक्षा दिली. ती रिक्षाने शाळेत ये-जा करीत असे. आरोपी शशी दानवे हा रिक्षाने त्या भागातील मुला-मुलींना शाळेत सोडायचा. त्यातूनच त्यांची ओळख झाली होती. दरम्यान, 27 जानेवारी 2018 रोजी पीडिता छोट्या बहिणीसोबत मैत्रिणीकडे जात असताना आरोपी शशी दानवे याने पाठीमागून येऊन तिचा हात धरला. फोन का करत नाही, असे म्हणून तिला छेडले होते.

मात्र, पीडितेने याबाबत तक्रार केली नव्हती. आरोपीचा हा प्रकार वाढल्यामुळे अखेर पीडितेने 19 एप्रिल रोजी रात्री जवाहरनगर ठाण्यात फिर्याद नोंदविली. या प्रकरणात विनयभंगासोबतच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणातील आरोपी शशी दानवे याला गुन्हे शाखेचे फौजदार योगेश धोंडे, हवालदार संतोष सोनवणे यांच्या पथकाने बाबा पेट्रोल पंप परिसरात अटक केली. त्याला तपास अधिकारी सहायक निरीक्षक एस. एन. कांबळे यांनी शुक्रवारी, 20 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देत हर्सूलला रवानगी करण्यात आली. 

Tags : Aurangabad, Atrocity,  rickshaw, driver