Mon, Nov 19, 2018 09:31होमपेज › Aurangabad › पायाभूत सुविधा न्यायव्यवस्थेच्या गतिमानतेला साह्यभूत : मुख्यमंत्री

पायाभूत सुविधा न्यायव्यवस्थेच्या गतिमानतेला साह्यभूत : मुख्यमंत्री

Published On: Jul 08 2018 1:59AM | Last Updated: Jul 08 2018 1:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘न्यायालयांमध्ये दाखल होणार्‍या प्रकरणांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून, न्यायालयेही पूर्ण क्षमतेने त्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशावेळी न्यायदान करणे सुलभ, गतिमान व्हावे, अडचणी निर्माण होणार नाहीत याकडे राज्य शासनाचे कटाक्षाने लक्ष आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेला आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात शनिवारी (दि. 7) ते बोलत होते.           

व्यासपीठावर या वेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमानी, राज्याचे विधी व न्यायमंत्री डॉ. रणजित पाटील, औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ न्या. रवींद्र बोर्डे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल कराड आदी उपस्थित होते.

न्यायालयात प्रकरणे दाखल होण्याचे मोठे प्रमाण लक्षात घेता पर्यायी वाद निवारण  (एडीआर) व्यवस्थेला जास्त बळकट करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या पद्धतीमुळे अनेक प्रकरणे न्यायालयासमोर येण्यापूर्वीच थांबू शकतील. सामंजस्याने समस्या निवारणामुळे न्यायव्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकतो. पक्षकारांचाही वेळ, पैसा यामुळे वाचेल, ताणतणावापासून त्यांची मुक्‍तता होऊ शकेल. न्यायव्यवस्थेला आवश्यक सर्व पायाभूत सुविधांकरिता 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून त्यापैकी 700 कोटी रुपये मंजूरही करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

न्यायव्यवस्थेवर ताण-ताहिलरमानी

न्यायव्यवस्थेवर कामाचा प्रचंड ताण असतानाही अत्यंत सक्षमपणे प्रकरणे हाताळली जाऊन निकाली निघत असल्याबद्दल न्यायव्यवस्थेशी संबंधित सर्वांचेच अभिनंदन केले. पक्षकार, वकील, कर्मचारी आणि न्यायाधीश यांच्यातील संतुलित सामंजस्यामुळे न्यायव्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे न्या. ताहिलरमानी यांनी स्पष्ट केले. न्या. रवींद्र बोर्डे यांचेही भाषण झाले. वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल कराड यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर अभय मंत्री यांनी आभार मानले.