Fri, Nov 16, 2018 23:30होमपेज › Aurangabad › नाथषष्ठी महोत्सवाची उत्साहात सांगता

नाथषष्ठी महोत्सवाची उत्साहात सांगता

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 12:49AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगपुर्‍यातील नाथ मंदिरात 1 मार्चपासून सुरू असलेल्या नाथषष्ठी महोत्सवाची शुक्रवारी (दि.9) ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने व प्रसाद वाटपाने सांगता झाली. यावेळी शहरातील हजारो भाविकांनी नाथांच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. 

याप्रसंगी ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख म्हणाले की, आपण आठवडाभर भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी एकत्रित येतो. सप्ताह सोहळ्याचे आयोजन करतो. अखेर शेवटच्या दिवशी काल्याचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करतो, परंतु काला प्रसादाची खरी सुरुवात केली ती भगवान श्रीकृष्णांनी. गोपाळ मित्रांना एकत्रित करून, लाह्या-पोहे गोळा करणे. त्यात दही घालून प्रसाद म्हणून खाणे अशा लीला भगवान श्रीकृष्णांनी केल्या. यामागील भगवंताचा मूळ उद्देश होता तो एकत्रीकरण करणे. हीच भूमिका आपण अंगीकारणे आवश्यक आहे. देश-धर्माच्या संरक्षणासाठी अशा महोत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी देशमुख महाराजांनी अनेक उदाहरणे देऊन कीर्तनात उपदेश केले. त्यानंतर भाविक भक्‍तांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली. सर्वांना काला प्रसादाचे वाटप करण्यात आले.   

यावेळी महोत्सवात सलग सात दिवस हजर राहणार्‍या भजनी मंडळांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रामदूत भजनी मंडळ, एकनाथ मंदिर महिला भजनी मंडळ, विठ्ठल-रुक्मिणी  भजनी मंडळ, गुरूदत्त मंदिर महिला भजनी मंडळ, अमृतेश्‍वर राममंदिर महिला भजनी मंडळासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाथा पारायण प्रमुख ह.भ.प. कृष्णा महाराज आरगडे, प्रमुख विणेकरी आसाराम बुवा गिरगे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संत एकनाथ मंदिर विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष सदानंद देवे, रवींद्रकुमार बडे, लक्ष्मण थोरात, विष्णू जाधव, दिनकर कोरान्ने, गणेश घुगे, सचिन वाळके, रायभान पाटील, सतीश म्हस्के, सोमनाथ मामा शेलार यांची उपस्थिती होती.