Sat, Feb 23, 2019 06:42होमपेज › Aurangabad › सहायक फौजदार खंडागळे अडकला लाचेच्या जाळ्यात

सहायक फौजदार खंडागळे अडकला लाचेच्या जाळ्यात

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी सहा हजारांची लाच घेताना छावणी ठाण्यातील सहायक फौजदाराला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी (दि. 15) छावणी ठाण्यात ही कारवाई केली. विशेष म्हणजे, खबरदारी म्हणून त्याने मोबाइलही ताब्यात घेतला होता. मात्र, त्यानंतरही तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. 

राजेंद्र उत्तमराव खंडागळे, असे लाच घेणार्‍या सहायक फौजदाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार हे खासगी नोकरी करतात. त्यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात तक्रार आली होती. त्याची चौकशी राजेंद्र खंडागळे याच्याकडे होती. त्यावरून खंडागळे याने त्यांना पोलिस ठाण्यात भेटण्यासाठी बोलाविले. तक्रारदार येताच त्यांना ‘तुमच्या विरुद्ध आलेल्या तक्रारीवरून प्रतिबंधित कारवाई करावी लागले’, अशी धमकी दिली. तसेच कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. विशेष म्हणजे, खबरदारी म्हणून त्यांचा मोबाइलही स्वतःकडे ठेवून घेतला. तक्रारदाराने याविरुद्ध एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यावरून लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली.

यात तडजोड करून खंडागळे याने सहा हजार रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पथकाने छावणी ठाण्यात सापळा रचला व तक्रारदाराकडून सहा हजार रुपये घेताना खंडागळे याला पकडले. त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक शंकर जिरगे, उपअधीक्षक किशोर चौधरी, महादेव ढाकणे, निरीक्षक प्रमोद पाटील, अश्‍वलिंग होनराव, संदीप आव्हाळे, बाळासाहेब राठोड, सुनील पाटील, संदीप चिंचोले यांनी केली.