होमपेज › Aurangabad › शस्त्र बनवणारा अटकेत, तलवारी जप्त

शस्त्र बनवणारा अटकेत, तलवारी जप्त

Published On: Jun 11 2018 12:39AM | Last Updated: Jun 11 2018 12:32AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

गुन्हे शाखेने आठवड्यापूर्वी शहरात तलवार आदी घातक शस्त्रे पकडली होती. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रविवारी सकाळी जोगेश्‍वरी येथे छापा मारून राहत्या घरात घातक शस्त्र बनविणार्‍यास अटक केली. 

यावेळी पोलिसांनी त्याच्या घरातून चार तलवारी, एक ढाल व शस्त्र बनविण्याचे साहित्य जप्‍त केले. याविषयी अधिक माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती मिळाली की, जोगेश्‍वरी येथील झोपडपट्टी भागात एक जण बेकायदेशिर घरात घातक शस्त्र बनवित आहे. यावरून उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी त्यांच्या सहकार्‍यासोबत रविवारी सकाळी जोगेश्‍वरी येथे छापा मारला असता शेख इरफान शेख युसूफ (28, रा. जोगेश्‍वरी) हा आपल्या राहत्या घरात तलवारी बनवत असताना त्यांना दिसून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घरातून चार धारदार तलवारी, ग्रँडर मशीन, एक ढाल व इतर साहित्य जप्‍त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार लक्ष्मण उंबरे,जमादार विजय होनवडजकर, पोलिस नाईक शैलेंद्र अडियल, देविदास इंदोरे, बाबासाहेब काकडे, एसपीओ अंबादास प्रधान यांनी केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शेख इरफान हा रिक्षाचालक असून त्याने किती तलवारी तयार करून कुणाकुणाला विक्री केल्या याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक साबळे यांनी सांगितले.