होमपेज › Aurangabad › स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर

स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 27 2018 12:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या स्थायी समितीमधील रिक्‍त होणार्‍या आठ जागांवर गुरुवारी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. भाजपकडून पूनम बमणे, जयश्री कुलकर्णी यांची, एमआयएमकडून सायराबानो अजमल खान, नसरीन खान आणि शहर विकास आघाडीकडून गजानन बारवाल आणि सत्यभामा शिंदे यांची निवड झाली. तर शिवसेनेकडून शिल्पा वाडकर आणि काँग्रेसकडून अब्दुल नविद यांची वर्णी लागली.

स्थायी समितीमधील 8 सदस्यांची मुदत 1 मे रोजी संपत आहे. यामध्ये विद्यमान सभापती गजानन बारवाल यांच्यासह कीर्ती शिंदे, राज वानखेडे, मनीषा मुंडे, सीताराम सुरे, अजीज अहमद रफिक, संगीता वाघुले आणि सोहेल शकील शेख यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्यासाठी गुरुवारी सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात त्या त्या पक्षांकडून ठरलेल्या कोट्याप्रमाणे सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांकडे सोपविण्यात आली. त्यानंतर महापौरांनी ही नावे वाचून दाखविली. भाजपकडून दोन सदस्यांना स्थायी समितीवर पाठविण्यात येणार होते. त्यासाठी माधुरी अदवंत, पूनम बमणे, शिवाजी दांडगे आणि रामेश्‍वर भादवे यांची नावे चर्चेत होती, परंतु ऐनवेळी पूनम बमणे आणि जयश्री कुलकर्णी यांची वर्णी लागली. सेनेकडून वाडकर यांनी बाजी मारली.

एमआयएममधील दलित नगरसेवकांमध्ये नाराजी

स्थायी समिती सदस्य निवडीवरून एमआयएमच्या दलित नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थायीत एमआयएमचे चार नगरसेवक आहेत. त्यात तीन मुस्लिम आणि एक दलित सदस्य होत्या. यातील एक दलित आणि एका मुस्लिम सदस्याचा समावेश होता. त्यामुळे पुन्हा एक दलित आणि एक मुस्लिम याचप्रमाणे संधी दिली जाईल, असा अंदाज होता, परंतु यावेळी दोन्ही मुस्लिम नगरसेवकांना संधी दिली गेली. त्यामुळे आता स्थायीत पक्षाचे चारही सदस्य मुस्लिम झाले आहेत. पक्षाचा विरोधी पक्ष नेता, गट नेता तसेच दोन्ही प्रभाग समित्या यावर मुस्लिम नगरसेवकांचीच वर्णी लागलेली आहे. एमआयएमच्या एकूण 25 नगरसेवकांमध्ये पाच नगरसेवक हे दलित आहेत. 

Tags : Aurangabad, Announcing,  selection,  Standing, Committee, members