होमपेज › Aurangabad › एमआयडीसीवरील हल्ला : हल्लेखोर ‘त्या’ कंपन्यांमधील असंतुष्ट कामगार!

एमआयडीसीवरील हल्ला : हल्लेखोर ‘त्या’ कंपन्यांमधील असंतुष्ट कामगार!

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 1:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी एमआयडीसीतील अनेक कंपन्यांवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत पोलिसांनी 68 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश हल्लेखोर हे ज्या कंपन्यांवर हल्ला झाला त्याच कंपन्यांमधील कामगार होते. त्यातील काहींना कंपनी व्यवस्थापनाने काही तरी कारणावरून नोकरीवरून काढून टाकलेले आहे, काही आरोपी कामगार कंपनी व्यवस्थापनावर असंतुष्ट होते, अशी माहिती तपासात समोर येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यावरून 9 ऑगस्ट रोजी ‘मराठा आरक्षण’ आंदोलनाची संधी साधून या असंतुष्टांनी कंपन्यांवर हल्ले करीत आपला स्वार्थ साधून घेतल्याचे दिसून येत आहे. 

9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र या दिवशी जागोजागी रास्ता रोको, ठिय्या आंदोलने करण्यात आली. वाळूज एमआयडीसीतही असाच रास्ता रोको करण्यात आला होता. दुपारपर्यंत आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते. दुपारनंतर मात्र वाळूज एमआयडीतील आंदोलनकर्त्यांना काही जणांनी भडकाविले आणि जमाव अचानक हिंसक बनला. या जमावाने वाळूज एमआयडीसीत घुसून सुमारे 70 ते 80 कंपन्यांमध्ये अक्षरश: हैदोस घातला. अनेक कंपन्यांची तोडफोड केली. जाळपोळ केली. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. एमआयडीसीवर झालेल्या या हल्ल्याने उद्योगजगत हादरून गेले.

उद्योजकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्‍त केल्या. थेट असेच  वातावरण राहिले तर आम्ही औरंगाबादेतून उद्योग हलविण्याचा विचार करू, अशी भूमिका उद्योजकांनी घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, या घटनेची पोलिस प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून फुटेज मिळवून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे हा हल्ला पूर्वनियोजित आणि नियोजनबद्ध पद्धतीने रचलेला कट होता, असा पोलिसांचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा संशय होता. तो संशयही आता आरोपींच्या अटकेनंतर समोर येऊ लागला आहे. एक तर आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींपैकी सुमारे 20 जण हे दुसर्‍याच समाजाचे आहेत. ज्यांचा मराठा आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता, हे समोर आले आहे. 

कामगारांमध्ये असंतुष्ट कंत्राटदारही...

वाळूज एमआयडीसी आणि गुन्हे शाखेच्या संयुक्‍तपथकांनी आतापर्यंत या प्रकरणात 68 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक हल्लेखोर आरोपी हे ज्या कंपन्यांवर हल्ला झाला तेथेच नोकरीला होते, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील काही जणांना कंपन्यांनी विविध कारणांवरून कामावरून काढून टाकलेले होते. त्यामुळे कंपनीवर त्यांचा रोष होता. तर काही जण कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत; परंतु त्यांचे व्यवस्थापनाशी जमत नाही, काही ना काही कारणांमुळे ते व्यवस्थापनाबाबत असंतुष्ट आहेत. कंपन्यांवरील आपला हाच राग काढण्यासाठी या आरोपींनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वापर केला. गर्दीत घुसून आपल्याच कंपन्यांमध्ये तोडफोड करण्यात या आरोपींचा हात असल्याचेही समोर आले आहे. या शिवाय आरोपींना भडकविण्यासाठी कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे छोटे-मोठे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदारांचाही हात असल्याचे आता समोर येत आहे. कंपनीकडून लेबर कंत्राट किंवा इतर प्रकारचे कंत्राट मिळाले नाही, म्हणून नाराज असलेल्या या कंत्राटदारांनीही समाजकंटकांना या आंदोलनात घुसवून हल्ला केला असावा, असे तपासात समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोरांना चिथावणी देणार्‍या म्होरक्यांचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे.