Fri, Feb 22, 2019 09:55होमपेज › Aurangabad › विभागीय आयुक्‍त भापकर यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार

विभागीय आयुक्‍त भापकर यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार

Published On: Jan 11 2018 1:38AM | Last Updated: Jan 11 2018 1:38AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

कूळ, इनाम, महारहाडोळा, गायरान जमीन विक्री प्रकरणात निलंबित करण्यात आलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर यांच्याविरुद्ध बुधवारी (दि. 10) सिटी चौक ठाण्यात जातिवादाची तक्रार दिली. या तक्रार अर्जावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, भापकर यांनीच कटके यांना काही दिवसांपूर्वीच निलंबित केले होते. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कूळ, इनाम, महारहाडोळा, गायरान जमीन विक्री प्रकरणात खात्री न करता, नियमबाह्यपणे विक्री परवानगी दिल्याचा ठपका असलेले निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे आणि सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली. कटके यांनी विभागीय आयुक्‍तांना 77 पानांचे पत्र देऊन निलंबनाची कारवाई कशी चुकीची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच, पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र, अद्यापही कटके यांचे निलंबन कायम आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी कटके यांच्या वकिलाने सिटी चौक ठाण्यात येऊन भापकर यांच्याविरुद्ध जातिवादाचा आरोप करणारी तक्रार केली होती, परंतु त्यांची तक्रार घेण्यासाठी पोलिस निरीक्षक ठाण्यात हजर नव्हते. मात्र, बुधवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास देवेंद्र कटके स्वतः सिटी चौक ठाण्यात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन आपला तक्रार अर्ज दिला. यात विभागीय आयुक्‍त भापकर यांच्याविरुद्ध जातिवादाचे विविध आरोप करण्यात आलेले आहेत.