Sun, Jul 21, 2019 02:14होमपेज › Aurangabad › उद्या समाजाने ‘लाथाडले’ तर...?

उद्या समाजाने ‘लाथाडले’ तर...?

Published On: Aug 11 2018 2:34PM | Last Updated: Aug 11 2018 2:34PMऔरंगाबाद : विनोद काकडे

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात आपल्याच एका बांधवाला ‘लाथाडले’. का? तर समाजासाठी त्याने चक्‍क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. अरे आज जो मराठा तरुण केवळ समाजासाठी आपले आयुष्य पणाला लावतोय, आत्महत्या करतो, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खातोय; पण उन्हातान्हात, उपाशीपोटी आंदोलनात दटून राहतोय, त्याला अशा एका लाथेने फरक तरी काय पडणार? थोरामोठ्यांच्या चरणाचे दर्शन घेणे हीच तर त्याची संस्कृती अन् ‘जातीसाठी खावी माती’ हेच त्याचे संस्कार... या संस्कारापायीच लाथ(बुक्या) खाऊनही जातीसाठी तो तरुण गप्पच बसला. दानवेंना मात्र, समाजापेक्षा पक्ष-पक्षनिष्ठा मोठी वाटली. म्हणून की काय आपल्या बांधवाला ‘लाथाडल्या’ची चूक केल्यानंतर वरून दानवेंनी स्वत:चे समर्थन करण्याची आणखी एक चूक केली. ही चूक त्यांच्या भावी राजकारणाला चांगलीच घातक ठरू शकते. कारण ज्याला ‘लाथाडले’ त्याचेच बांधव आपले मतदार आहेत अन् या मतदारांनी आपल्याला मतपेटीतून ‘लाथाडले’ तर? याचा विचार लाथ मारण्यापूर्वी दानवे यांनी करायला हवा होता, असा सूर मराठा समाजातून उमटत आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या स्थापनेत अंबादास दानवे यांचे योगदान नक्‍कीच दुर्लक्षित करता येणारे नाही. 9 ऑगस्ट2016 च्या पहिल्या क्रांती मोर्चापासून ते आजतागायत ते आंदोलनात सक्रिय राहिलेले आहेत. केवळ दानवेच नाही तर त्यांच्यासारखे मराठा समाजातील अनेक वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, उद्योजक, प्रतिष्ठित नागरिकही मराठा समाजाच्या आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी होत आहेत. दानवे आणि इतर लाखो मराठा बांधवांमधील फरक इतकाच की, इतर बांधव ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा कानी पडताच आपला पक्ष, पद, प्रतिष्ठा, गरिबी-श्रीमंतीची झूल बाजूला ठेवून समाजासाठी रस्त्यावर उतरत आहे. दानवेंना मात्र, ते जरा अवघड जात आहे. आंदोलनात येताना पक्षाची झूल बाजूला ठेवणे त्यांना जमत नाही अन् हीच बाब समाजाच्या एका वर्गाला खटकत आहे. 

 आज मराठा समाजाचा रोष कुण्या एका पक्षावर, नेत्यावर नाही. तो सर्वच पक्ष, नेत्यांवर आहे. आपल्या समाजाचे इतके मुख्यमंत्री झाले तरी ते आपल्याला आरक्षण देऊ शकले नाहीत, ही खंत आणि खदखद समाजात आहेच. त्यामुळेच तर शरद पवारांसह सर्वच मराठा नेत्यांच्या विरोधातही आंदोलनादरम्यान घोषणाबाजी होते. इतकेच की सध्या भाजप-सेना युतीचे सरकार आहे, त्यामुळे युतीच्या नेत्यांवर समाजाचा जास्त रोष दिसतो. 

या आंदोलनात ज्यांना आपल्या पक्ष, नेत्यांपेक्षा समाज मोठा वाटतोय ते उघडपणे समाजासाठी आंदोलनात सहभागी होताहेत, ज्यांना जमत नाही ते दुरूनच अप्रत्यक्ष मदत करताहेत. अंबादास दानवे मात्र, दोन्ही डगरीवर हात ठेवण्याची कसरत करीत आहेत. मात्र, हा सुवर्णमध्य साधणे तितके सोपे नाही, हेच त्यांना उमजेनासे झाले आहे. त्यामुळे तर या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांची चिडचिड वाढत आहे. 

मराठा आंदोलनात असा विरोध फक्‍त अंबादास दानवेंनाच झाला असे नाही. शिवसेना खा. चंद्रकांत खैरे यांच्यावरही कायगाव येथे मराठा समाजासाठी बलिदान देणार्‍या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी असाच प्रसंग उद्भवला होता. तसेच शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाही आंदोलनादरम्यान, अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु यापैकी कुणीही प्रत्युत्तर दिले नाही. उलट आंदोलकांच्या भावना जाणून घेत आपल्या राजकीय ‘परिपक्‍वते’चा नमुना पेश केला.  दानवे येथेच चुकले,त्यांना हे जमले नाही.

समाजात नाराजीचा सूर
अंबादास दानवे यांनी आपल्याला समाजापेक्षा पक्ष, पक्षनिष्ठा मोठी आहे, हे दाखवित पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शाब्बासकीची थापही मिळविली असेल; परंतु त्यांच्या या कृत्याने मराठा समाजातील एक मोठा वर्ग नाराज झाला आहे, हे वास्तवही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. उद्या निवडणुकांमध्ये हाच समाज आपला मतदार आहे. आज पक्षासाठी आपण समाज बांधवाला लाथाडले, उद्या समाज आपल्याला स्वीकारेल? याचाही विचार त्यांनी ‘लाथ’ उचलण्यापूर्वी करायला हवा होता, असा सूर आता मराठा समाजातून उमटत आहे.