होमपेज › Aurangabad › ॲमेझॉनचे संस्थापक बेजोस यांना वेरूळची भुरळ

ॲमेझॉनचे संस्थापक बेजोस यांना वेरूळची भुरळ

Published On: Jun 24 2018 7:35AM | Last Updated: Jun 24 2018 7:48AMऔरंगाबाद/खुलताबाद : प्रतिनिधी

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वांत धनाढ्य व्यक्‍ती जेफ बेजोस यांनी शनिवारी (दि.23) औरंगाबादचा सहकुटुंब धावता दौरा केला. वेरूळ येथील लेणीस भेट दिल्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते वाराणसीला रवाना झाले. वेरूळ लेणीच्या शिल्पकलेने बेजोस कुटुंबीयांना भुरळ घातली.

बेजोस यांचे पत्नी व मुलासह दुपारी साडेबारा वाजता खासगी जेट विमानाने चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. जगातील सर्वांत धनाढ्य व्यक्‍ती विमानतळावर उतरल्याचे बघून तेथे हजर असणार्‍यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. शहरवासीयांच्या छोटेखानी स्वागतचा स्वीकार करून बेजोस कुटुंबीय वेरूळला रवाना झाले. बेजोस यांचा दौरा अत्यंत गोपनीय होता. विमानतळ प्रशासन, पोलिस, पर्यटन विकास महामंडळ, महसूल खात्याला या दौर्‍याची कसलीही कल्पना नव्हती. त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून सुरक्षाही देण्यात आली नव्हती, हे विशेष.

फोर्ब्सने जगातील श्रीमंतांची यादी नुकतीच जाहीर केली. 141.9 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक असणार्‍या बेजोस यांनी या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावले. तेव्हापासून बेजोस हे जगभरात चर्चेत आले आहेत.

लेणीच्या आविष्काराने थक्‍क

बेजोस कुटुंबीयांनी सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे वेरूळ येथील 10 ते 16 क्रमांकांच्या लेणी पाहिल्या. चैत्य लेणीतील गौतम बुद्धांची भव्य मूर्ती, कैलास लेणी व कैलास मंदिराच्या आविष्काराने या कुटुंबीयांना भुरळ घातली. लेणींमधील शिल्पकला बघून बेजोस कुटुंबीय भारावले. त्यांनी पाच तास पर्यटनाचा आनंद लुटला.