Wed, Apr 24, 2019 01:43होमपेज › Aurangabad › सत्तेत आल्यानंतर सेनेच्या वाघाची शेळी व नंतर ससा झाला : अजित पवार

‘सत्तेत आल्यानंतर सेनेच्या वाघाची शेळी व नंतर ससा झाला’

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:50AMऔरंगाबाद ः विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांची नावे, मोबाइल क्रमांक लिहून घेण्याच्या, तसेच आयुक्‍तालय परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्याच्या प्रकारामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी संतप्त झाले. पाठीमागच्या दाराने आणलेली ही आणीबाणी कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सभेच्या प्रारंभीच गुन्हे शाखेचे तीन पोलिस पत्रकार कक्षात आले. पत्रकार व संबंधित वृत्तपत्राचे नाव तसेच मोबाइल क्रमांक लिहून देण्याची सक्‍ती ते करू लागले. ही बाब अजित पवार यांच्या कानावर घालण्यात आली असता, त्यांनी माईकचा ताबा घेऊन पोलिसांचे वाभाडे काढले. त्यानंतर सभेत झालेल्या भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला. ‘सत्ता येत-जात असते, तुम्ही आमचाही कारभार बघितला आहे. असे वागलात तर सत्तेत आल्यानंतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. इंटरनेट सेवा बंद करून सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असून, पाठीमागील दाराने आणलेली ही आणीबाणी सहन केली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या चार वर्षांच्या काळात मराठवाड्यात एकही धरण, साठवण तलाव अथवा बॅरेजेसचे काम झाले नसल्याची टीका त्यांनी केली. एमपीएससी घोटाळ्याची चौकशी करून वेळेवर परीक्षा घेण्याची मागणीही त्यांनी केली. आयुष्यमान भारत या योजनेवर त्यांनी टीका केली. या योजनेसाठी लागणारे 50 लाख कोटी रुपये कोठून आणणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना सत्तेत आहे का बाहेर, हे समजत नाही. सत्तेत आल्यानंतर सेनेच्या वाघाची शेळी व नंतर ससा झाला. आता मात्र कासव झाला असून, धक्‍का लागताच ते अंग ओढून घेतात, असा आरोप पवार यांनी केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. राज्य मंत्रिमंडळाच्या तीन वर्षांपूर्वी औरंगाबादेत झालेल्या बैठकीत मराठवाड्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 37 पैकी एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुका केव्हाही होवोत, मात्र सरकारला पदच्युत केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

खड्ड्यांचे शहर : सुळे

औरंगाबाद शहरात रस्त्यांऐवजी खड्डेच पाहायला मिळाले. रस्त्यांची स्थिती पाहता खड्ड्यांचे शहर म्हणून औरंगाबाद ओळखले जाईल, अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. देशातील वातावरण बदलत असल्याचे गुजरात व राजस्थानातील निवडणुकांनी दाखवून दिले असून, सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. नवाब मलिक यांचेही भाषण झाले. आ. सतीश चव्हाण आणि आ. भाऊसाहेब चिकटगावकर यांनी रुमणे भेट देऊन शरद पवार यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीचे राज्यभरातील वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित होते.