Thu, Jun 27, 2019 02:27होमपेज › Aurangabad › एअर इंडियाचे काम चौथ्या दिवशीही ठप्प

एअर इंडियाचे काम चौथ्या दिवशीही ठप्प

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

विजेचा दाब अचानक वाढल्याने सिडको टाऊनशिप परिसरातील एअर इंडियाच्या कार्यालयातील संगणक जळून चार दिवस उलटले. आजपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने चौथ्या दिवशीही कार्यालयातील कामकाज ठप्प होते. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विजेचा दाब नियंत्रित आणि स्थिर करण्यात यावा, यासाठी महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला असल्याचे एअर इंडियाचे व्यवस्थापक रमेश नंदेय यांनी सांगितले.

शुक्रवारी (दि. 24) दुपारी विजेचा दाब वाढल्यामुळे एअर इंडियाच्या कार्यालयातील संगणक, राऊटर, अ‍ॅडप्टरसह अन्य साहित्यांचे नुकसान झाले होते. शुक्रवारपासून या कार्यालयातील कामकाज पूर्ण बंद असल्यामुळे या कार्यालयातून होणार्‍या तिकीट बुकिंगचे काम विमानतळावरील तिकीट खिडकीवरून करण्यात येत आहे. मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयास घडलेल्या घटनेची माहिती दिली असून, त्यांनी साहित्य पाठविण्यात येईल, असे कळविले असले तरी मंगळवारी सायंकाळपर्यंत साहित्य दाखल झाले नसल्याचे रमेश नंदेय यांनी सांगितले. या कार्यालयात विजेचा दाब स्थिर ठेवावा अशी मागणी करणारे पत्र महावितरणच्या अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले. या पत्राची दखल घेऊन त्या परिसरातील विजेचे काम करण्यात आले. मात्र विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याचे निदर्शनास आले. रमेश नंदेय यांनी विजेचा दाब स्थिर राहत नसल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविल्यामुळे त्यांनी विजेचा दाब अर्ध्या तासाला तपासणी करून त्याचा अहवाल कळवा अशा सूचना दिल्या आहेत. सध्या तरी विजेचा दाब कमी-अधिक होत असल्याचे महावितरण कंपनीला कळविण्यात आले. नव्याने येणारे उपकरणे महागडे असल्यामुळे विजेचा दाब स्थिर झाल्याशिवाय लावण्यात येऊ नये, असे वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले असल्याचे रमेश नंदेय यांनी सांगितले.