होमपेज › Aurangabad › लाच मागणार्‍या कृषी सहायकाला अटक

लाच मागणार्‍या कृषी सहायकाला अटक

Published On: Mar 07 2018 2:43AM | Last Updated: Mar 07 2018 2:34AM पाचोड  : प्रतिनिधी

 राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कांदा चाळ प्रकल्पाची अनुदान रक्कम काढण्यासाठी साडेआठ हजारांची लाच मागणार्‍या वडजी (ता. पैठण) येथील कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.    यासंबंधी अधिक माहिती अशी, वडजी (ता. पैठण) येथील महिला शेतकरी जयश्री कचरू भांड यांना गट क्रमांक 224 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत एक लाख 75 हजार रुपये खर्चाची कांदा चाळ मंजूर झाली होती. यासाठी कृषी विभागाकडून 87 हजार 500 रुपये अनुदान देय होते. कृषी विभागाच्या निकषाप्रमाणे जयश्री भांड यांनी कांदा चाळीचे काम पूर्ण करून कृषी विभागाकडे अनुदान रक्कम मिळण्यासाठी विनंती केली.

त्यानुसार पैठण तालुका कृषी कार्यालयातील वडजी येथे कार्यरत असलेले कृषी सहायक लखन भीमराव वाहुळे ( रा. थेरगाव, ता. पैठण) याने सदर योजनेच्या लाभार्थी जयश्री भांड यांचे दीर बापूसाहेब सरसराव भांड यांच्याकडे कांदा चाळीचे मोजमाप घेऊन (मूल्यांकन) मोजमाप पुस्तिकेत त्याची नोंद करून वरिष्ठांकडे स्वाक्षरीनिशी मोजमाप पुस्तिका सादर करणेसाठी टएकूण बिलाची दहा टक्के (रुपये 8750) ची मागणी केली. भांड यांनी आपण प्रामाणिकपणे कांदाचाळीचे काम केले, आता पैसे कशासाठी असे विचारले असता हे आमचे सर्व वरिष्ठांना दिल्याशिवाय बिले काढता येत नाही, ते दिल्याशिवाय बिल निघणार नसल्याचे स्पष्ट सांगून मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करून ते वरिष्ठांपुढे सादर करण्यास टाळाटाळ सुरू केली.

हतबल झालेल्या जयश्री भांड यांचा दीर बापूसाहेब भांड यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून कार्यवाहीची मागणी केली. आठ दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून कारवाईची तयारी केली असता त्याने पळ काढला. दरम्यान, कृषी सहायक वाहुळे व शेतकरी भांड यांच्यात लाच देण्या-घेण्या संबंधीची संभाषण झालेली ध्वनिफीत पोलिसांनी जप्त केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रमोद सचिन पाटील, हरिश्चंद्र कुर्‍हे यांच्या पथकाने वाहुळे यास पैठणच्या तालुका कृषी कार्यालयातून मंगळवारी (ता. सहा) ताब्यात घेतले. त्यास पाचोड पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली.