होमपेज › Aurangabad › उपचारावेळीही शहराची चिंता; शुद्धीवर येताच विचारले,‘दंगल शांत झाली का?’

उपचारावेळीही शहराची चिंता; शुद्धीवर येताच विचारले,‘दंगल शांत झाली का?’

Published On: May 16 2018 10:34AM | Last Updated: May 16 2018 10:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जुन्या औरंगाबादमध्ये उसळलेल्या दंगलीत दगड लागल्याने गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्‍त गोवर्धन कोळेकर यांनी 13 मे रोजी शुद्धीवर येताच बोलता येत नसतानाही चिठ्ठी लिहून दंगल नियंत्रणात आली का? आणि पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांची प्रकृती कशी आहे? याची विचारपूस केली. एकीकडे दंगल नियंत्रणात पोलिस कमी पडल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना एसीपी कोळेकरांना स्वतःपेक्षा शहराची चिंता असल्याचे यातून प्रामुख्याने समोर आले.

गांधीनगर-मोतीकारंजा भागात दोन गट समोरासमोर आल्याचे समजताच शुक्रवारी रात्री शहर विभागाचे एसीपी कोळेकर घटनास्थळी दाखल झाले. सोबत पोलिस निरीक्षक श्रीकांत परोपकारी आणि पोलिसांचा फौजफाटा होताच. कामाचा अनुभव आणि समजावून सांगण्याची हातोटी असल्याने कोळेकर घटनास्थळी दाखल होताच त्यांनी जमावात घुसून शांततेचे आवाहन केले. त्याचवेळी बिथरलेल्या जमावातून आलेला एक दगड लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांच्या स्वरयंत्रणेची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, औरंगाबादेत उपचार सुरू असताना रविवारी सकाळी साडेसहा वाजता ते शुद्धीवर आले. स्वरयंत्रणेला मार लागल्याने आणि ऑपरेशन केलेले असल्याने त्यांना काहीच बोलता येत नव्हते. परंतु, त्यामुळे कोळेकर शांत बसले नाहीत. त्यांनी डॉक्टरांना खुणावून चिठ्ठी आणि पेन देण्यास सांगितले. डॉक्टरांनीही डायरी देऊन लिहायला लावले. सर्वांना वाटले ते स्वतःच्या आजाराबाबत किंवा कुटुंबीयांबाबत विचारपूस करतील. मात्र, कोळेकरांनी पहिला प्रश्‍न लिहिला तो रात्रीची घटना शांत झाली काय? आणि दुसरा प्रश्‍न लिहिला पीआय परोपकारी यांची प्रकृती कशी आहे? यावरून त्यांच्यातील खरा पोलिस शहरवासीयांना पाहायला मिळाला. कुटुंबाची, स्वतःच्या यातनांची विचारपूस न करता त्यांना शहराची जास्त चिंता होती.

No automatic alt text available.

प्रकृतीत सुधारणा
औरंगाबादेतून सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता एसीपी गोवर्धन कोळेकर यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती उपायुक्‍त राहुल श्रीरामे यांनी दिली.