Thu, Sep 19, 2019 03:40होमपेज › Aurangabad › एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा होणार सुरू

एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा होणार सुरू

Published On: Jun 12 2019 6:28PM | Last Updated: Jun 12 2019 6:28PM
औरंगाबादः प्रतिनिधी 

देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढविण्याच्या मागणीसाठी टूर ऑपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांचे एक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये आहे. पहिल्या दिवशी या शिष्टमंडळाची बैठक स्पाईस जेट, इंडिगो एअरलाईन्सच्या व्यवस्थापकीय समितीसोबत, तर दुसऱ्या दिवशी या शिष्टमंडळाची बैठक एअर इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी आणि कार्यकारी  संचालक मिनाक्षी मलिक यांच्यासोबत बैठक झाली. येत्या दिवाळीपूर्वी औरंगाबाद-मुंबई-उदयपूर विमानसेवा सुरू करणार असल्याचे एअरइंडियातर्फे सांगण्यात आले.

दोन दशकांपूर्वी औरंगाबाद हे राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र वीस वर्षांपूर्वी ही विमानसेवा बंद पडली. तेव्हापासून आजपर्यंत ही विमानसेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी नागरीक, उद्योजक, व्यापारी आणि पर्यनटकांकडून होत होती. मात्र, आतापर्यंत ही मागणी पूर्ण होत नव्हती. अखेरीस औरंगाबादमधील सर्वांनी मागणी केल्याने एअर इंडियाकडून ही विमानसेवा दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी आश्वासन मिळाले. 

या शिष्टमंडळामध्ये हॉटेल उद्योजक सुनित कोठारी, औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, सचिव नितीन गुप्ता, इंडियन असोसिअशन ऑफ टूर ऑपरेटरचे अध्यक्ष प्रणब सरकार  आणि इंडियन असोसिअशन ऑफ टूर ऑपरेटरचे उपाध्यक्ष राजीव मेहरा यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाने औरंगाबादची बाजारपेठ, पर्यटन, उद्योग आणि संस्कृतीचीही माहिती दिली. 

या चर्चेत स्पाईस जेटच्या पाच अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे की, मागील वर्षी आम्ही औरंगाबादमध्ये नव्या विमानसेवेसाठी चाचपणी केली होती. मात्र, तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये बराच बदल झालेला दिसतोय. औरंगाबादमधून व्यवसायवृद्धी होणार असेल तर येत्या पंधरा ते वीस दिवसांत स्पाईस जेटचे एक शिष्टमंडळ येवून चाचणी करून जाणार. या चाचणीत सकारात्मक प्रतिसाद आल्यास दिवाळीच्या आसपास आम्ही औरंगाबादेतून नवी विमानसेवा नक्कीच सुरू करू.

यावेळी अश्विनी लोहानी यांनी सांगितले की, औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर असून याठिकाणी नव्या विमानसेवा सुरू करण्यास इच्छूक आहोत. आजघडीला औरंगाबादमध्ये उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत. हे बदल पाहता औरंगाबाद विकासाच्या वाटेवर आहे. त्यामुळे औरंगाबाद हे राजस्थानशी जोडणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी ही विमानसेवा सुरू होती. आता दिवाळीच्या आसपास पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्याचा फायदा निश्चितच औरंगाबादेतील उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनवाढीसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

डिस्कव्हर इंडिया फेअरचे होणार पुनरूज्जीवन

परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवासात सूट मिळत असलेली डिस्कव्हर इंडिया फेअर ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर एअर इंडियाने सांगितले की, पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी ही योजना नक्कीच फायद्याची ठरू शकेल. १५ ते २१ दिवसांसाठी ही योजना सुरू करण्याचा विचार केला जाईल. ही योजना पुन्हा सुरू झाल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल. त्याशिवाय औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने लावून धरली आहे.