होमपेज › Aurangabad › कॉलेज बंद पडल्यावर प्राध्यापकाने सुरू केली बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी

कॉलेज बंद पडल्यावर प्राध्यापकाने सुरू केली बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 21 2018 1:23AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

डी.एड., बी.एड. कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या एकाने कॉलेज बंद पडल्यावर चक्‍क बनावट प्रमाणपत्रे देणारी टोळी सुरू केली. त्याच कॉलेजमध्ये असणार्‍या एका विद्यार्थ्याकडूनच तो ही कला शिकला होता. नगर, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत या टोळीने हजारो नागरिकांना अपंगांची बनावट प्रमाणपत्रे, तसेच एसटीचे सवलतीचे बोगस प्रमाणपत्र काढून दिले.   या प्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

परमेश्‍वर भगवान बडे, बाबामियाँ हसन सय्यद (दोघे रा. शेवगाव, जि. अहमदनगर), शेख नदीम शेख गुलाम नबी आणि किशोर पंढरीनाथ नागपुरे (दोघे रा. सिल्लोड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील बडे हा टोळीचा सूत्रधार असून त्याचे शिक्षण एम.ए.बी.एड. पर्यंत झाले आहे. तो पूर्वी शिरूर (जि बीड) येथे एका डी.एड., बी.एड. कॉलेजमध्ये प्राध्यापक होता. 

याबाबत पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी सांगितले की, सिल्लोड बसस्थानक परिसरात काही लोक पैसे घेऊन अपंगांचे प्रमाणपत्र व एसटीची सवलत मिळणारे बोगस प्रमाणपत्र काढून देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून उपनिरीक्षक विवेक जाधव आणि त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यांनी पथकासह सिल्लोड बसस्थानकात छापा मारून शेख नदीम व किशोर नागपुरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा बोगस प्रमाणपत्रं जप्त केले. त्यांची चौकशी केली. मात्र, त्यांनी तोंड उघडले नाही. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर नदीम व किशोर यांनी बाबामिया हसन सय्यद व परमेश्‍वर बडे यांच्याकडून हे प्रमाणपत्र काढल्याची कबुली दिली. पोलिसांनी पैठण येथे छापा मारून बडे आणि बाबामिया या दोघांना ताब्यात घेतले.