Fri, Aug 23, 2019 23:47होमपेज › Aurangabad › 25 वर्षांपूर्वी

25 वर्षांपूर्वी

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

तारीख 26 एप्रिल 1993... वेळ दुपारी एक वाजेची...112 प्रवासी अन् 6 क्रू मेंबर घेऊन इंडियन एअरलाइन्सच्या (आयसी- 491) विमानाने औरंगाबाद विमानतळावरून मुंबईसाठी उड्डाण भरले... काही क्षणही उलटले नव्हते, प्रवासी विमानात स्थिरावलेही नव्हते तोच जोरदार आवाज झाला... विमान हेलकावे खाऊ लागले. काय झाले कुणाला काही समजेना. विमानात एकच गोंधळ उडाला. काही उमजण्याच्या आतच औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून झेपावलेले हे विमान विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूड काझी शिवारात 55 जणांचा जीव घेऊन विसावले... औरंगाबादेत घडलेल्या या सर्वांत भीषण विमान अपघाताच्या दुर्घटनेला गुरुवारी (दि. 26) 25 वर्षे पूर्ण झाली!

या विमानातून औरंगाबादेतील अनेक उद्योजक प्रवास करीत होते. इंडियन एअरलाइन्सचे हे विमान दिल्ली-जयपूर-उदयपूर-औरंगाबादमार्गे मुंबईकडे जाणार होते. हे विमान 26 एप्रिल 93 रोजी नित्याप्रमाणे दुपारी औरंगाबाद विमानतळावर पोहचले होते. येथे काही वेळ थांबल्यानंतर प्रवाशांना घेऊन विमान मुंबईला जाणार होते. विमानात जयपूरहून 24, उदयपूरहून 37 आणि औरंगाबाद विमानतळावरून 51 प्रवासी बसले. सहा क्रू मेंबरही विमानात होते. अशा एकूण 118 जणांना घेऊन दुपारी एक वाजेच्या सुमारास या विमानाने औरंगाबादच्या धावपट्टीवरून मुंबईसाठी उड्डाण घेतले.    55 जणांचा बळी घेऊन विसावले..!

ट्रकला धडकल्याने हेलकावले

धावपट्टीवरून उड्डाण घेताच वैमानिकाकडून उंचीचे जजमेंट चुकल्याने या विमानाची चाके धावपट्टीच्या कंपाउंडला घासली गेल्याचे सांगितले जाते. चाके घासल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमानाची दिशाच बदलली. हे विमान अगदी कमी उंचीवर असतानाच जालना रोडकडे वळाले. त्याचवेळी एक मालवाहतूक करणारा ट्रक रस्त्याने जात होता. विमानाची चाके पुन्हा या ट्रकला धडकली. त्यानंतर वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि ते वरूड काझीच्या दिशेला वळाले. या धडकाधडकीने विमानात एकच गोंधळ उडाला. ते हेलकावे खाऊ लागले. काही क्षणांतच विमान चक्‍क वरूड काझी शिवाराकडे असलेल्या अतीउच्चदाबाच्या विजेच्या तारांना घासले. त्यामुळे त्यास आग लागली.

तुकडे तुकडे झाले

आग लागल्यानंतर विमानात स्फोट झाला आणि त्याचे तीन तुकडे होऊन अखेर वरूड काझी शिवारात ते कोसळले. चिकलठाणा विमानतळापासून हा परिसर तीन किलोमीटर अंतरावर आहे. या अपघातात विमानातील 55 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. तर 63 जणांचे प्राण वाचले होते.

काहींनी मारल्या उड्या

विमानाला आग लागल्यानंतर एअरहोस्टेसने प्रसंगावधान दाखवित विमानाचा समोरचा दरवाजा उघडला. त्यावेळी विमान उडत होते. तेव्हा घाबरलेल्या काही प्रवाशांनी चक्‍क समोरच्या दरवाजातून उडत्या विमानातून उड्या मारल्या होत्या. त्यामुळे ते जायबंदी झाले; परंतु बचावले होते. 

बोर्डीकरांसह अनेक बचावले

तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ए. मुगदिया, नरेंद्र कुमार जोशी, ए. बी. भालेराव यांच्यासह  63 जण या अपघातातून बचावले होते. काहींना किरकोळ इजा झाली होती, तर काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या विमानातून काही परदेशी प्रवासीही प्रवास करत होते. 

धूत यांच्यासह व्हिडिओकॉनचे चेअरमन नंदलाल धूत, उद्योजक अरुण जोशी यांच्यासह औरंगाबादेतील अनेक उद्योजक, व्यापार्‍यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. त्या काळात विमान प्रवास हा सर्वसामान्यांच्या अवाक्यात नव्हता. त्यामुळे विमानात औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक व्हीआयपीच होते. 

औरंगाबादच्या इतिहासातील एकमेव विमान अपघात

हा औरंगाबादच्या इतिहासातील पहिला आणि एकमेव विमान अपघात होता. यानंतर औरंगाबादेत असा विमानाला मोठा अपघात घडलेला नाही.

ते पहिल्या ताफ्यातील विमान

दुर्घटनाग्रस्त विमान इंडियन एअरलाइन्सच्या ताफ्यात दाखल झालेल्या पहिल्या विमानांपैकी एक होते. त्याने सेवेची 19 वर्षे आणि 43 हजार 886 तासांचे उड्डाण पूर्ण केले होते. चिकलठाणा विमानतळावरून ते उड्डाण करीत असताना वैमानिक कॅप्टन एस. एन. सिंग आणि सहवैमानिक मनीषा मोहन यांच्याकडे त्याची उड्डाणसूत्रे होती. 

मित्र गमावल्याचे दु:ख

चिकलठाणा विमानतळावर झालेल्या अपघातामधून मी सुदैवाने बचावलो. विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणांतच ते कोसळले. कोसळल्यानंतर धुरामुळे समोरचे काही दिसेना. कसाबसा बाहेर आलो. तोपर्यंत मदतीसाठी आलेल्या जीपमधून विमानतळावर आलो, तेथून कंपनीची गाडी मागविली आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झालो. या अपघातात माझा मित्र अरुण जोशी मी गमावला. पूर्वी धावपट्ट्या या काहीशा कमी आणि अरुंद असत. विमानांची देखभाल फारशी होत नसे. आता परिस्थिती बदलली असली तरी सेवेत आणखी सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मत गरवारे कंपनीचे तत्कालीन संचालक अनिल भालेराव यांनी व्यक्‍त केले.

‘त्या’ अपघातानंतरच विमानतळाचे विस्तारीकरण

आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीजवळच्या बीड रस्त्यावरून कापसाने भरलेला ट्रक जात होता. त्याच वेळी चिकलठाणा विमानतळावरून उड्डाण केलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या बोईंग 737 विमानाची चाके या ट्रकमधील कापसाला घासली आणि पुढे विमानाच्या चिंधड्या उडाल्याने 55 जण मृत्युमुखी पडले होते.  या भीषण घटनेनंतरच विमानतळ प्राधिकरणाने चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेतला होता. यासाठी विमानतळाच्या आसपासच्या अनेक शेतकर्‍यांची जमिनी संपादित केल्या गेल्या. तत्पूर्वी अपघातानंतर तत्काळ बीड रोड वाहतुकीस पूर्णपणे बंद करून धावपट्टीपासून मैलभर अंतरावर पर्यायी रस्ता बांधला गेला.

Tags : Aurangabad, Aeroplane, accident, 25, years, ago