Thu, May 28, 2020 08:58होमपेज › Aurangabad › रस्त्यावर वाहने उभी केल्यास कारवाई

रस्त्यावर वाहने उभी केल्यास कारवाई

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:40AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हजारो, लाखो रुपये फीस घेणार्‍या अनेक कोचिंग क्‍लासेसला स्वतःची पार्किंग नाही. क्‍लासेससमोर अतिशय बेलगामपणे रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे पोलिस आयुक्‍तांनी क्‍लासेस चालकांना पार्किंगची सोय करा किंवा रस्त्यावर वाहने उभी राहणार असतील तर स्वतःचा सुरक्षा रक्षक नेमून ती सुस्थितीत लावा, असे आदेश दिले आहेत. रस्त्यावर वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली तर क्‍लासेसवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी दिला.

मंगळवारी (दि. 10) पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी मुंबईत सहआयुक्‍त (वाहतूक) पदावर दोन वर्षे काम केले आहे. वाहतूक पोलिसिंगचा त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे. औरंगाबादेतही त्यांनी काही दिवसांपूर्वी वाहतुकीचे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. या प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यात येणार असून विविध संघटनांशी चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी त्यांनी सहायक पोलिस आयुक्‍त चंपालाल शेवगण यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. रिक्षांना स्टँड वाढवून देण्याचा विचार सुरू असून चौकातील थांबे बंद करण्यात येतील. ज्या रस्त्यांवर दुभाजक आहे त्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी पार्किंग लाईन आखण्यात येईल. तसेच, दुभाजक नसणार्‍या रस्त्यांवर पी-1, पी-2 ही सुविधा चांगल्या पद्धतीने राबविली जाईल. याबाबत मनपाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. व्यापार पेठेतील रस्ते वन-वे करण्यात येतील, असेही त्यांनी सुचविले.

Tags : Aurangabad, Action, taken, Vehicles, parked, road