Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Aurangabad › ई-पॉज मशीन न वापरणार्‍यांवर कारवाई

ई-पॉज मशीन न वापरणार्‍यांवर कारवाई

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:14AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ई-पॉज (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) मशीनद्वारे कार्डधारकांना धान्य वाटप करण्यास टाळाटाळ करणार्‍या जिल्ह्यातील रेशन दुकानदारांवर कारवाईचा फास आवळणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील 304 रेशन दुकानदारांची अनामत रक्‍कम जप्‍त करण्यात आली, यातील 194 रेशन दुकानदारांनी त्यानंतरही धान्य वाटपात सुधारणा न केल्याने त्यांच्यावर परवाने रद्द करण्याची कारवाई होणार आहे. 

रेशनिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळावे, यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी ई-पॉज मशीनद्वारे धान्य वाटप प्रणाली आणली. जिल्ह्यात 1801 रेशन दुकाने असून दुकानदारांना हे मशीन कसे हाताळायचे, याबाबत अनेकदा प्रशिक्षण देण्यात आले. नेटवर्क व इतर अडचणीही दूर केल्या गेल्या. आता 1 मेपासून ई-पॉजद्वारे धान्य वाटप करणे बंधनकारक केले आहे. 

शिवाय लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीत, आधार क्रमांक नाही, अशा परिस्थितीत लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी मॅन्युअली धान्य देण्याचीही सवलत दिली आहे. मात्र, अनेक रेशन दुकानदार ई-पॉज मशीनबाबत तक्रार करून, मॅन्युअली धान्य वाटप करत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यातील धान्य वाटपाच्या रिपोर्टआधारे, जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील 304 रेशन दुकानदारांवर अनामत रक्‍कम जप्‍त करण्याची कारवाई केली. शहरातील रेशन दुकानासाठी 3 हजार तर ग्रामीण भागातील रेशन दुकानांसाठी 1 हजार अनामत रक्‍कम घेतली जाते. मे महिन्यात धान्याचे परमिट घेण्यापूर्वी त्यांच्याकडून पुन्हा अनामत रक्‍कम वसूल करण्यात आली. त्यामुळे ही रक्‍कम जप्‍त केल्याने, त्यांच्यावर एक प्रकारे दंडात्मक कारवाई झाली आहे. 

आता या दुकानदारांना तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला असून, या कालावधीत ई-पॉजद्वारे धान्य वाटपात प्रगती दिसून न आल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. धान्य वाटप अहवालानुसार यातील 194 दुकानदारांचे ई-पॉजद्वारे केलेले व्यवहार हे 30 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आलेले आहे. यात वाढ न केल्यास, या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी दिला आहे.