पैठण ः प्रतिनिधी
जायकवाडी धरणातील पक्षी अभयारण्यात अवैधरित्या मासेमारी करणार्या 50 जणांचे जाळ्याचे साहित्य यांत्रिक बोटीच्या साह्याने धाडी मारून नष्ट करण्यात आले. ही कारवाई वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता केली. दरम्यान, वन्यजीव विभागाचे पथक येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 50 मच्छिमार घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले.
जायकवाडी धरणाच्या दहा किलोमीटरच्या भिंतीलगत मासेमारी करण्यास न्यायालयाच्या आदेशानुसार सक्तमनाई आहे. या ठिकाणी मासेमारी केल्यास संबधितांवर वन्यजीव अधिनियम 1972 नुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जातो. दरम्यान, काही मच्छिमार धरणाच्या भिंतीलगत अवैधरित्या मासेमारी करत असल्याची माहिती औरंगाबाद येथील वन्यजीव विभागाला मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कर्मचार्यांनी जायकवाडी धरण परिसरात सहा कि.मी.पर्यंत विविध ठिकाणी यांत्रिक बोटीच्या साह्याने धाडी मारून 50 मच्छीमारांचे जाळ्याचे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. ही कारवाई वन्यजीव विभागाचे वनपाल भगवान परदेशी, वनरक्षक पोपट बर्डे, संदीप एकशिंगे, हरिश्चंद्र घुगे, संदीप हटकर, संगीतलाल भवरे, सुरय्या शेख यांनी केली.