Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Aurangabad › केळगावच्या तलाठ्यासह कोतवाल निलंबनाची कारवाई 

केळगावच्या तलाठ्यासह कोतवाल निलंबनाची कारवाई 

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 22 2017 1:13AM

बुकमार्क करा

सिल्लोड : प्रतिनिधी 

मालमत्ता दस्तऐवजातून हुसकावून लावण्याच्या हेतूने अनेक शेतकर्‍यांची नावे सात बारामधून वगळल्याचा ठपका ठेवत केळगाव येथील तलाठी एस. सी. दांडगे व कोतवाल विठ्ठल त्र्यंबक राठोड यांना उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांनी निलंबित केले आहे.

कैलास दला राठोड, (ह. मु. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) यांच्या कुटुंबाची आधारवाडी ता. सिल्लोड शिवारात गट क्रमांक 16 मध्ये 4 हेक्टर 96 आर. जमीन असून ती त्यांच्या कुटुंबाच्या नावे होती. त्यांनी 21 सप्टेंबर 2017 रोजी या गटाचा सातबारा सिल्लोड येथील सेतू सुविधा केंद्रावरून काढला असता त्या सातबारा वरून त्यांच्या कुटुंबाचे नाव गायब होते. नावे गायब झाल्याचे बघून राठोड यांच्या पाया खालची जमीन सरकली होती.

याप्रकरणी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी अर्ज करून या तलाठी दांडगे व कोतवाल राठोड यांनी सदर जमिनीच्या सातबार्‍यावरून नावे कमी केल्याची तक्रार करून सदर सातबार्‍यावर कुटुंबाचे नावे कायम करण्याकरिता विनंती अर्ज सादर केला होता. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांनी विभागीय चौकशी करून संबंधित तलाठी व कोतवाल यांना बाजू मांडण्याच्या हेतूने खुलासा करण्याचे आदेश दिले होते, परंतु दोघांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा दिला नाही व आपल्या कर्तव्यात कसूर केला.

सदर तलाठी दांडगे व कोतवाल यांनी ही चूक जाणीव पूर्वक केल्याची बाब चौकशीत समोर दिसून आल्याने माचेवाड यांनी दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांनी सोयगाव तहसील कार्यालयात हजेरी द्यावी, या काळात त्यांनी खासगी नोकरी करू नये, असे आदेशात म्हटले आहे.