Thu, May 23, 2019 05:04



होमपेज › Aurangabad › महावितरणची २६९ वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई

महावितरणची २६९ वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई

Published On: Dec 03 2017 2:39AM | Last Updated: Dec 03 2017 1:58AM

बुकमार्क करा





औरंगाबाद : प्रतिनिधी

महावितरणच्या सुरक्षा  व अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्‍यांनी एकाच वेळेस मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान धडक कारवाई राबवून 269 वीज चोर्‍या पकडून 53 वीज ग्राहकांविरुद्ध कारवाई केली. मुंबईच्या पथकाने शहरात येऊन कारवाई केल्याने स्थानिक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
मुंबई येथील पथकाने सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. एकाच वेळी लातूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, जालना,

हिंगोली व परभणी जिल्ह्यांतील सुमारे एक हजार 421 वीज ग्राहकांची तपासणी केली. यात प्रामुख्याने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, लॉजची तपासणी करण्यात आली, यात 269 वीज चोर्‍या उघडकीस आल्या असून यातील 153 ग्राहकांच्या मीटरमध्ये फेरफार केल्याचा संशय आल्याने त्याची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. तर 53 वीज ग्राहकांवर कारवाई केली आहे. या पथकात पुणे, नागपूर, परिक्षेत्र कार्यालयातील सुमित कुमार, शिवाजी इंदलकर, मंगेश वैद्य, बत्तलवाड, आदींच्या नेतृत्वाखाली 36 भरारी पथके व संबंधित संचालन व सुव्यवस्था मंडळ कार्यालयात कार्यरत असलेले 46 सहायक अभियंते सहभागी होते. मुंबईच्या पथकाने जिल्ह्यात येऊन कारवाई केल्याने स्थानिक अधिकार्‍यांत खळबळ उडाली आहे.  अशीच धडक मोहीम मराठवाड्यात अचानक राबवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अरविंद साळवे यांनी दिली.