होमपेज › Aurangabad › पाटबंधारे कार्यकारी अंभियंतावर कारवाई 

पाटबंधारे कार्यकारी अंभियंतावर कारवाई 

Published On: Dec 12 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 1:59AM

बुकमार्क करा

सिल्लोड : प्रतिनिधी

पाणीटंचाई भूत मानगुटीवर बसलेले असताना तालुक्यातील केळगाव धरणातून शेतीसाठी पाणी सोडल्याने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. पी. संत यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 107 नुसार तहसीलदार संतोष गोरड यांनी कारवाई केली आहे. सदरील कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे. 

यावर्षी तालुक्यातील नदी नाल्यांना पूर गेला नाही परिणामी धरणे, कोल्हापुरी बंधारे, लघु व मध्यम प्रकल्प, पाणी पुरवठा करणार्‍या विहिरी यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही, तसेच खेळणा, निल्लोड पाणी प्रकल्पातील पाणीसाठा संपलेला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये तालुक्यातील गावांना पाणी पोहोचविण्यासाठी आगामी काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. टँकरसाठी लागणारा पाणीसाठा केळगाव धरणात आहे. असे असताना पाटबंधारे विभागाने गत आठवड्यात केळगावच्या धरणातून मुर्डेश्वर पाणी वापर संस्थेला पाणी देण्यासाठी पाटात पाणी सोडले होते. मात्र, या प्रकाराची माहिती मिळताच केळगावच्या ग्रामस्थांनी हा प्रकार थांबवविण्याची मागणी धरणावर उपस्थित असणार्‍या पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांकडे केली होती. मात्र, त्यांनी मागणीकडे दुर्लक्ष करत पाणी सोडल्याने ग्रामस्थांनी सदरील प्रकारात हस्तक्षेप करत सोडण्यात आलेले पाणी थांबविले. यावेळी चारशे ते पाचशे लोंकाचा जमाव याठिकाणी होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे असताना तहसीलदार, पोलिस यंत्रणेने परिस्थितीवर नियत्रंण मिळविले होते. या प्रकारामुळे पाटबंधारे कार्यकारी अभियंता पी. पी. संत यांनी घेतलेल्या आडमुठी धोरणामुळे तहसीलदार गोरड यांनी त्यांना जवाबदार धरत कलम 107 नुसार कारवाईस पात्र ठरविले आहे.

कारवाई टाळण्यासाठी अभियंत्याला घ्यावा लागेल जामीन 

दरम्यान पाणी टंचाईचे भान न राखत पाटबंधारे विभागाने कर्तव्यात कसूर केली. पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा प्रशासनाच्या इराद्यावर पाणी फेरले गेले. शिवाय ग्रामस्थांनी हारकत घेत पाणी पाटात न सोडण्यासाठी आक्रमक प्रवित्रा घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. या घटनेची दखल तहसीलदार संतोष गोरड यांनी घेत पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांना दोषी ठरविले. त्यांच्यावर केलेल्या कारवाइतून त्यांना सुटण्यासाठी वकीलामार्फत जामीन घ्यावा लागणार आहे.