Thu, Jun 27, 2019 16:09होमपेज › Aurangabad › बायपासवर पंधरा दिवसांत चौथा बळी

बायपासवर पंधरा दिवसांत चौथा बळी

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपासवर अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पटेल लॉन्ससमोर पुन्हा एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाली. भाडेकरू महिलेसोबत भाजीपाला खरेदीसाठी शहरात येताना हा अपघात झाला. पंधरा दिवसांत बायपासवर गेलेला हा चौथा बळी आहे.

शुभदा सुधीर कुपटेकर (48, रा. रो-हाऊस क्र. 16 बी, देवडानगर, बायपास) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती एलआयसीमध्ये नोकरीला असून, त्यांच्या पश्‍चात दोन मुले आहेत, असे कुटुंबीयांनी सांगितले. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शहानूरमियाँ दर्गा येथे आठवडी बाजार भरतो. तेथून भाजीपाला खरेदी करण्यासाठी शुभदा कुपटेकर या भाडेकरू उज्ज्वला संघा यांच्यासोबत दुचाकीवर (क्र. एपी 28, बीएफ 9734) पाठीमागे बसून दर्गा चौकात येण्यासाठी निघाल्या. त्यांची दुचाकी दुपारी साडेबाराच्या सुमारास देवडानगरच्या कमानीतून बीडबायपासवर आली. त्याचवेळी महानुभाव आश्रम चौकाकडून एमआयटीकडे जाणार्‍या भरधाव ट्रकने (क्र. एचआर 3, डब्ल्यू 6064) दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पाठीमागे बसलेल्या शुभदा कुपटेकर या रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात त्यांच्या डोक्याला आणि कंबरेला जबर मार लागला. अपघात घडताच रस्त्यावरून जाणार्‍या इतर नागरिकांनी ट्रकचालकाला पकडले. तोपर्यंत दुचाकीचालक संघा यांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. तसेच, जखमी शुभदा यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर त्यांचा मृतदेह घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

दोन आठवड्यांत चौथी घटना 

बीड बायपासवर पंधरा दिवसांत चार निष्पापांचा बळी गेला आहे. सर्वप्रथम निशांत पार्क समोर, दुसरी घटना देवळाई चौक, गोदावरी टी, आणि सोमवारी पटेल लॉन्स समोरच अपघातात एकाचा मृत्यू झाला.