Sun, May 19, 2019 11:58
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › गर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी 

गर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

बेकायदा गर्भपातप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केलेल्या ललिता रमेश मून ऊर्फ खाडे हिने केलेल्या बोगसपणाचे अनेक नमुने दररोज उघड होऊ लागले आहेत. तिने गर्भपातासाठी लागणार्‍या औषधींची शहरातील दोन मेडिकलवरून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून मेडिकलवाल्यांनीही सर्व नियम धाब्यावर बसवून डॉ. ललिता मून नावाने बोगस बिले दिल्याचे समोर आले आहे. यावरून वैद्यकीय व्यवसायातील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले की, अर्चना सुनील वाघ या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर तपास करताना पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक आव्हाड यांनी आपत भालगाव येथे गर्भपाताचा अड्डा शोधून काढला. या प्रकरणात ललिता रमेश मून ऊर्फ खाडे (40, रा. आपत भालगाव), सुनील शिवाजी वाघ (27, रा. बजाजनगर, वाळूज), बापू काशीनाथ डिघोळे (53, रा. वडगाव सलामपुरे) या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. आरोपींना गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.