Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Aurangabad › ‘ऑरिक’च्या अँकर प्रोजेक्टमध्ये कर्नाटकचा खोडा

‘ऑरिक’च्या अँकर प्रोजेक्टमध्ये कर्नाटकचा खोडा

Published On: Jan 20 2018 2:04AM | Last Updated: Jan 20 2018 1:54AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

‘डीएमआयसी’ अंतर्गत शेंद्रा-बिडकीन येेथे उभारल्या जाणार्‍या औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीच्या (ऑरिक) अँकर प्रोजेक्टमध्ये आता कर्नाटकने खोडा घातला आहे. मारुती सुझुकी, होंडा कार यांच्या इलेक्ट्रिकल वाहननिर्मितीचे प्रकल्प ऑरिकमध्ये व्हावेत, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालविले असताना आता कर्नाटकनेदेखील या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी पायघड्या घातल्या आहेत.

ऑरिक सिटीतील किया मोर्टसचा अँकर प्रोजेक्ट तेलंगणाने दीड वर्षापूर्वी पळविला होता. तेव्हापासून अँकर प्रोजेक्ट आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. प्रदूषणास आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहन निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने घेतली आहे. या उद्योगांना भरघोस अनुदानदेखील दिले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मारुती सुझुकी आणि होंडा कार यांनी आपले इलेक्ट्रिकल वाहननिर्मिती उद्योग ऑरिकमध्ये सुरू करावेत, यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईत पुढील आठवड्यात होणार्‍या ‘मेक इन महाराष्ट्र’ या प्रदर्शनात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे, मात्र आता या कंपन्या पळविण्यासाठी कर्नाटकही रिंगणात उतरले आहे.

कर्नाटकचे उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी या दोन्ही उद्योगांच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार केला आहे. कर्नाटकने इलेेक्ट्रिकल वाहन निर्मितीचे धोरण आखले आहे. राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मुबलक जागा उपलब्ध असल्याने कर्नाटकातच गुंतवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

50 मध्यम कंपन्या आणा - कुलकर्णी
ऑरिक सिटीत अँकर प्रोजेक्ट आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र असा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अँकर प्रोजेक्ट आणण्याऐवजी राज्याने 50 मध्यम प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी केले आहे.