Fri, Nov 16, 2018 23:28होमपेज › Aurangabad › विमानतळासमोर उभारणार ऐतिहासिक स्थळांची प्रतिकृती

विमानतळासमोर उभारणार ऐतिहासिक स्थळांची प्रतिकृती

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 1:43AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या वतीने चिकलठाणा विमानतळासमोर मुख्य रस्त्यावर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक स्थळांची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. तब्बल 41 लाख रुपये खर्चाच्या या कामाची निविदा बुधवारी स्थायी समितीने मंजूर केली. हे काम लवकरच सुरू होणार असल्याचे मनपाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

संपन्न अशा ऐतिहासिक वारशामुळे औरंगाबाद शहराचे जागतिक नकाशावर अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक शहरात येतात. विमानाने येणार्‍या पर्यटकांना विमानतळाबाहेर पडताच जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाची कल्पना यावी यासाठी मनपाने विमानतळासमोर जालना महामार्गावर प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार पालिकेने काही दिवसांपूर्वीच 41 लाख रुपये एवढ्या अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या या कामाची निविदा प्रसिद्ध केली होती. चार ठेकेदारांनी त्यांच्या निविदा दाखल केल्या. त्यात मुबारक पठाण या ठेकेदाराची निविदा सर्वात कमी म्हणजे अंदाजपत्रकीय दरापेक्षा 12 टक्के कमी दराची आहे. त्यामुळे प्रशासनाने ही निविदा अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवली होती. त्याला स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. हे काम नऊ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. या प्रतिकृतीत अजिंठा-वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, बीबी का मकबरा यासह विविध ऐतिहासिक स्थळांचे प्रतिबिंब असणार आहे. 

डीपीसीचा निधी

विमानतळासमोरील ऐतिहासिक प्रतिकृतीसाठी पालिकेकडे 41 लाख 4 हजार रुपयांचा निधी उपलब्ध आहे. हा निधी जिल्हा नियोजन समितीमधून प्राप्‍त झालेला आहे. पर्यटनास चालना देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीने पालिकेला हा निधी दिलेला आहे.