Tue, Jul 07, 2020 21:36होमपेज › Aurangabad › घाटी परिसरात होणार ५० खाटांचे आयुष रुग्णालय

घाटी परिसरात होणार ५० खाटांचे आयुष रुग्णालय

Published On: Jan 29 2018 1:42AM | Last Updated: Jan 29 2018 1:15AMऔरंगाबाद : प्रकाश जाधव

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत शहरात 50 खाटांचे आयुष रुग्णालय उभारले जाणार आहे. यासाठी आयुष मंत्रालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाकडे (घाटी) यासाठी जागा मागितली आहे, मात्र घाटी प्रशासनाने अद्याप याला मंजुरी दिलेली नाही. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांनी आयुष मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारला असून घाटी प्रशासनानेही जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

केंद्र सरकारने आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी या प्राचीन चिकित्सा पद्धतींना चालना देण्यासाठी  आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. या मंत्रालयामार्फत देशभर आयुष रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. आयुष नॅशनल मिशन अंतर्गत औरंगाबादेत 50 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी घाटी रुग्णालयाकडे 11 मे 2017 रोजी जागेची मागणी करण्यात आली आहे, मात्र अद्यापही घाटी प्रशासनाने या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया कळविलेली नाही. विशेष म्हणजे राज्यातील अमरावती, नागपूर अंबेजोगाई आदी महाविद्यालयांनी आयुष मंत्रालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता फक्त घाटीच्या निर्णयाची प्रक्रिया बाकी आहे. 

आयुष रुग्णालयासाठी परिसरात कोठे जागा द्यावी, असा प्रश्‍न घाटी प्रशासनासमोर आहे. घाटीने यापूर्वीच ऑक्युपेशनल व फिजीओथेरपीचा प्रस्ताव पाठविलेला असून यासाठीही घाटीला जागा लागणार आहे. मात्र केंद्रीय आयुष मंत्रालयाचा निर्णय असल्याने त्यांना आयुष रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावीच लागणार आहे. या  रुग्णालयामुळे मराठवाडा, विदर्भ व खानदेशातील गरजू रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे.