Sat, Aug 17, 2019 16:14होमपेज › Aurangabad › 13 वर्षांच्या मुलीला ‘तो’ देतोय ‘रेप’ची धमकी

13 वर्षांच्या मुलीला ‘तो’ देतोय ‘रेप’ची धमकी

Published On: Apr 23 2018 10:54PM | Last Updated: Apr 23 2018 10:54PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

देशभर अल्पवयीन मुलींच्या छेडछाड, बलात्कार आणि खुनाच्या घटनांमुळे आधीच जगात भारताची मान शरमेने खाली गेली आहे. त्यात भर म्हणून की काय अजूनही अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडत आहेत. शहरातील सिटी चौकात 13 वर्षीय मुलीला एकाने अश्‍लील शिवीगाळ करून चक्‍क बलात्काराची (रेप करण्याची) धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली, परंतु आजारपणाचे कारण पुढे आल्याने न्यायालयाने त्याला तत्काळ जामीन मंजूर केला.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने सिटी चौक ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी शेख सलीम शेख इब्राहिम (रा. शहाबाजार, काचीवाडा) याला अटक करण्यात आली होती. त्याने अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिची छेड काढली. तिला अश्‍लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तसेच, भयंकर म्हणजे त्याने अल्पवयीन मुलीला चक्‍क बलात्काराची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास अधिकारी महिला उपनिरीक्षक ए. एन. पाटील यांनी आरोपी शेख सलीम याला अटक केली होती.

अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीचे अनेक गुन्हे शहरात घडतात. हे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी उपाययोजनाही केल्या. मात्र, जवळचे मित्र, नातेवाईकच आरोपीच्या पिंजर्‍यात असल्याने या घटनांना रोखणे पोलिसांनाही पूर्णपणे शक्य नाही. दरम्यान, सध्या कठुआ आणि उन्नाव येथील घटनांमुळे रोज प्रकरण चिघळत चालले आहे. या घटनांच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच आणखी अशाच घटना समोर येताना दिसत आहेत.