Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Aurangabad › ९० महाविद्यालयांचे होणार फेरमूल्यांकन

९० महाविद्यालयांचे होणार फेरमूल्यांकन

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 1:46AMऔरंगाबाद : गजेंद्र बिराजदार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नीकरण समित्यांच्या तपासणीत 2017-2018 या शैक्षणिक वर्षात 90 महाविद्यालये अनुत्तीर्ण झाली. या महाविद्यालयांत पुन्हा समित्या पाठवून त्यांचे फेरमूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या महाविद्यालयांना सुधारणा (इम्प्रूव्हमेंट) घडवून आणण्याचीसंधी देण्यात आली आहे. आता त्यांनी सुधारणा घडवून नाही आणली तर शैक्षणिक वर्ष 2018-2019 मध्ये त्यांचे संलग्नीकरण रद्द केले जाऊ शकते. 

विद्यापीठाच्या परिक्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे आहेत. या जिल्ह्यांत 420 महाविद्यालये असून 2017-2018 या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नीकरण समित्या पाठवून त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीचे तीन प्रमुख निकष आहेत. पहिला निकष अनिवार्य मूलभूत सुविधेचा आहे. यासाठी 150 गुण असून 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. इतर आवश्यक सुविधा आणि संबंधित विषय या निकषांना अनुक्रमे 200 आणि 100 गुण असून त्यापैकी निम्मे गुण मिळविणे अनिवार्य आहे. 12 ते 13 महाविद्यालयांना उत्तीर्णतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक ते पाच गुण कमी मिळाले. या महाविद्यालयांना सशर्त संलग्नीकरण प्रमाणपत्र देण्यात आले.

तथापि, 90 महाविद्यालये अनुत्तीर्ण झाली. या महाविद्यालयांना सुधारणा घडवून आणण्यासाठी विद्यापीठाकडून एक संधी देण्यात आली. त्यांचे फेरमूल्यांकन होणार आहे. यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्या लवकरच संबंधित महाविद्यालयांना भेटी देऊन तपासणी करणार आहेत. फेरतपासणीत जी महाविद्यालये नापास होतील. त्यांचे संलग्नीकरण रद्द करण्याचा विषय विद्या परिषदेत मांडला जाईल व विद्या परिषद त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितले. 

आधी उत्तीर्ण, आता अनुत्तीर्ण असे कसे

या 90 महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालयांना पाच ते सात वर्षांचा कालावधी लोटला आहे. यापूर्वीही या महाविद्यालयांची संलग्नीकरण समित्यांमार्फत तपासणी होऊन त्यांना संलग्नीकरण दिले गेले आहे. मग यावेळी ही महाविद्यालये तपासणीत अनुत्तीर्ण कशी झाली हे कोडे आहे. याबाबत शैक्षणिक विभागातील अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी यापूर्वीचे आपण सांगून शकत नाही, असे उत्तर दिले.