Tue, Jul 07, 2020 07:24होमपेज › Aurangabad › राज्याच्या तिजोरीत ९ हजार कोटींची भर

राज्याच्या तिजोरीत ९ हजार कोटींची भर

Published On: Jun 13 2019 1:31AM | Last Updated: Jun 13 2019 12:29AM
औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी 

मराठवाड्याने राज्य सरकारची तिजोरी भरण्यात मोठा वाटा उचलला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात मराठवाड्याने राज्य सरकारला 9,247 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे. यंदाच्या दुष्काळाचा फटका महसुलासदेखील बसला असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यात तीन हजार कोटींची घट झाली आहे.

अबकारी शुल्क व सीमाशुल्क कराऐवजी दोन वर्षांपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. मराठवाड्याने 2018-19 या आर्थिक वर्षात जीएसटीच्या रूपाने 3,654 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला. यात केंद्रीय जीएसटीचा वाटा 1,118 कोटी रुपयांचा आहे. स्कोडा कार कंपनीकडून केंद्र सरकारला सर्वाधिक जीएसटी मिळत असतो. स्कोडाच्या विक्रीत घट झाल्याचा परिणाम केंद्रीय जीएसटीवर झाला. राज्य जीएसटीला 1,616 कोटीचा महसूल मिळाला. 

एकात्मिक जीएसटीमधून 920 कोटी रुपयांचा कर मिळाला. देशाची लिकर राजधानी असणार्‍या औरंगाबाद शहराने राज्य सरकारला उत्पादन शुल्क कराच्या माध्यमातून यंदा 4,310 कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे. याशिवाय विविध सेसच्या माध्यमातून 549 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला

571 कोटींचा पी.एफ.

सरत्या आर्थिक वर्षात मराठवाड्यातील उद्योग आस्थापनांनी 571 कोटी रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीचा भरणा केला. कामगार विमा योजनेतही 162 कोटी रुपयांची भर घातली आहे.
2015-16 मध्ये 

सर्वाधिक महसूल

मराठवाड्यात 2015-16 या वर्षात चांगला पाऊस झाला. परिणामी, केंद्र व राज्य सरकारला या वर्षी 12,900 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. 2014-15 मध्ये 12,752 कोटी, 2013-14 या वर्षी 11,859 कोटी, 2012-13 या वर्षी 11,452 कोटी रुपयांची भर या विभागाने केंद्र व राज्याच्या तिजोरीत घातली होती. 2011-12 या वर्षीच्या दुष्काळात 9,805 कोटी रुपयांचा महसूल मराठवाड्याने मिळवून दिला होता. यंदाचा दुष्काळ सर्वात दाहक होता. परिणामी 2011-12 या वर्षापेक्षाही कमी महसूल जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन हजार कोटींचा प्राप्तिकर

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे करदात्यांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेष मोहीम व जनजागृतीमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एक लाखापेक्षा अधिक करदाते वाढले असून, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 2,126 कोटी रुपयांचा प्राप्‍तिकर वसूल झाल्याची माहिती प्रधान आयुक्‍त के. पी. सी. राव यांनी दिली. देशात नोटाबंदी झाल्यापासून कर चोरी करणार्‍यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याशिवाय प्राप्तिकर भरण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. त्यामुळे कर भरणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मराठवाड्यात एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 1 लाख 27 हजार 611 नवीन करदाते वाढले असून, तब्बल 2 हजार 126 कोटींचा महसूल प्राप्‍त झाला आहे.