Thu, Jul 18, 2019 02:31होमपेज › Aurangabad › एकाच परीक्षेला एकाच जन्मतारखेचे 824 परीक्षार्थी

एकाच परीक्षेला एकाच जन्मतारखेचे 824 परीक्षार्थी

Published On: Jan 19 2018 1:48AM | Last Updated: Jan 19 2018 12:26AMऔरंगाबाद : जे. ई. देशकर

एसटी महामंडळात कधी काय होईल हे सांगणे जरा कठीणच आहे. अशीच एक घटना बुधवारी उघडकीस आली. एक कनिष्ठ टंकलेखक लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला एकच दिवस, एकच महिना आणि एकच वर्ष असे एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 824 परीक्षार्थी बसले होते. हे सर्व एकाच दिवशी व एकाच वर्षात विविध ठिकाणी जन्मले असले तरी ते एकाच खात्यात कार्यरत असून खात्याअंतर्गत परीक्षा देत असल्याने दिवसभर एसटी महामंडळात याची चर्चा सुरू होती.

त्याचे झाले असे की एसटी महामंडळाच्या वतीने खाते अंतर्गत कनिष्ठ टंकलेखक लिपिक पदासाठी खात्याअंतर्गत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला नियमांनुसार ज्याचे शिक्षण व इतर अटी पूर्ण करणार्‍या चालक, वाहक व मेकॅनिक संवर्गातील कर्मचार्‍यांना या पदावर खात्याअंतर्गत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली. या संधीचा फायदा घेण्यासाठी 867 कर्मचार्‍यांनी परीक्षेसाठी अर्ज केला. ही परीक्षा बुधवारी (दि. 17) रोजी शहरातील चार परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यावेळी 824 परीक्षार्थी उपस्थित होते. दरम्यान त्यांना मंगळवारी (दि. 16) या परीक्षेचे हॉलतिकीट देण्यात आले. हॉलतिकिटांवर अनेकांची जन्म तारीख 10 ऑक्टोबर-1990 अशीच आल्याने त्यांनी एसटी प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रार येताच प्रशासनाने हॉलतिकिटची यादी तपासली असता एक-दोन नव्हे, तर सर्वच परीक्षार्थीच्या हॉलतिकिटांवर 10 ऑक्टोबर-1990 तारीख असल्याचे लक्षात येताच अधिकारीही चक्रावले. त्यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली. ही माहिती समजताच वरिष्ठांनी हॉलतिकीट वाटपाची प्रक्रिया तत्काळ थांबवा व परीक्षार्थींना त्यांच्या अर्जाच्या क्रमांकावर परीक्षेला बसू देण्याचे फर्मान सोडले. शेवटी येथील प्रशासनाने हॉलतिकिटाचे वितरण थांबवून त्या-त्या परीक्षार्थींना अर्जाचा क्रमांक देऊन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ऐनवेळी झालेल्या घोळामुळे परीक्षार्थीही काही काळ गोंधळात पडले होेते. तर सुमारे 43 जणांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. अशा गोंधळात ही परीक्षा पार पडली. 

परीक्षा सुरळीत 
ही चूक संबंधित कंपनीची आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसारच परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली आहे. बुधवारी झालेली परीक्षा सुरळीत पार पडली आहे. हॉलतिकीट नसल्यामुळे कुठलीच अडचण आली नाही. 

ए. एल. घोडके विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी