Sun, Jun 16, 2019 02:31होमपेज › Aurangabad › नवरदेव ८० वर्षांचा, नवरी ७५ वर्षांची 

नवरदेव ८० वर्षांचा, नवरी ७५ वर्षांची 

Published On: Feb 22 2018 9:19AM | Last Updated: Feb 22 2018 9:19AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बाबा पेट्रोलपंपाजवळील म्हाडा कॉलनीत लग्‍नाची लगबग सुरू होती. एरव्ही नेहमीप्रमाणे विवाहसमारंभ असेल असे सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष जेव्हा बोहल्यावर वधू-वरांचे आगमन झाले, तेव्हा अनेकजण चक्रावून गेले. वर चक्‍क 80 वर्षांचा तर वधूचे वय होते 75 वर्षे. हा आगळावेगळा विवाह सोहळा 4 मुले, सुना, 14 नातू, 5 पणतू, नातेवाईक अशा 500 च्या जवळपास वर्‍हाडींच्या उपस्थितीत पार पडला. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवरदेव रामराव किसनराव धस हे एसटी महामंडळातून 1996 साली ट्रॅफिक इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले. आज त्यांचे वय 80 वर्षे आहे. त्यांचा बालविवाह झाला होता. त्यावेळी त्यांचे वय होते फक्‍त 11 वर्षे व वधूचे वय होते 5 वर्षे. आपला विवाह कसा झाला याबाबत काहीही आठवत नसल्याची खंत दोघांच्याही मनात होती. यामुळे त्यांचा मुलगा राजू रामराव धस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा त्यांचे लग्‍न लावण्याच कल्पना कुटुंबीयांसमोर मांडली. कल्पना वेगळी असली तरीही चैतन्यदायी होती. सर्वांनी ती मान्य केली.  

त्यानंतर म्हाडा कॉलनी येथील एकता मंचचे सदस्य व परिवार यांच्या सहकार्याने हा आगळावेगळा विवाह सोहळा मंत्रोच्चारात बुधवारी सायंकाळी 6ः30 वाजता पार पडला. या विवाहासोबतच रामराव धस यांची सहस्रदर्शन पूजा करण्यात आली. यानंतर रामराव धस यांची धान्यतुला करून ते धान्य अनाथ आश्रमात वाटप करण्याचा निर्णय झाला. अतिश सोनुने, रवी सुराशे, प्रशांत मगरे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार राजू रामराव धस यांनी मानले.