होमपेज › Aurangabad › ७५१ विद्यार्थ्यांचे रात्री तयार केले हॉलतिकीट

७५१ विद्यार्थ्यांचे रात्री तयार केले हॉलतिकीट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीला सरसकट कॅरिऑन दिल्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्यांना हॉलतिकीट मिळाले नाही. त्यामुळे गोंधळ उडाला. महाविद्यालयांनी विद्यापीठात धाव घेतल्यानंतर परीक्षा विभागाने रात्री साडेतीन वाजेपर्यंत काम करून हॉलतिकीट तयार करून दिले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली. 50 टक्के एटीकेटीचा निर्णय अंगलट येत असल्यामुळे विद्यापीठाने एटीकेटी तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरसकट कॅरिऑन दिले. त्याआधारे 751 विद्यार्थ्यांनी पुढील सत्रात प्रवेश घेतला. परंतु, झालेल्या निर्णयाप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या अनेक विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट जनरेट झालेच नाही.

ही बाब परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना कळाली. त्यांनी दोन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना रात्री बोलावून घेतले. पुणेच्या एमकेसीएल कंपनीशी बोलून स्वॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर हॉलतिकीट जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु, मध्यरात्री 12 वाजेनंतर विद्यापीठाचे सर्व्हर बंद होते. तसेच एमकेसीएलचे सर्व्हरही रात्री बंद करण्यात येते. त्यामुळे या कामात अडथळा येणार होता. डॉ. नेटके यांनी विद्यापीठाच्या आणि एमकेसीएलच्या तंत्रज्ञाशी संपर्क करून सर्व्हर चालू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर मध्यरात्री साडेतीन वाजेपर्यंत सर्व 751 विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट जनरेट होऊन विद्यार्थ्यांना दुसर्‍या दिवशी परीक्षेला बसता आले.