Thu, Jul 18, 2019 05:00होमपेज › Aurangabad › संच मान्यता मिळवून देण्याचे आमिष

संस्थाचालकांना ७० लाखांचा गंडा

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मंत्रालयात ओळख आहे, शाळेला पंधरा शिक्षकांची संच मान्यता मिळवून देतो, अशा थापा मारून भामट्याने संस्थाचालक महिलांना तब्बल 70 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी शनिवारी (दि. 26) पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची (बुधवारपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली.

रामेश्‍वर महादेव कानघुले (38, रा. आर्च संकुल, गारखेडा परिसर, पंडित नेहरू कॉलेजसमोर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, रेखा चंद्रकांत रेखे (43, रा. शास्त्रीनगर, जवाहरनगर) या शंकरबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बजाजनगर, वाळूजच्या कोषाध्यक्ष आहेत, तर पुष्पा रामचंद्र जोशी (रा. शास्त्रीनगर, जवाहनगर) या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. रेखे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली. त्यांच्या संस्थेची बजाजनगर येथे त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत प्रत्येक वर्गाच्या तीन तुकड्या आहेत. एक तुकडी अनुदानित असून उर्वरित दोन्ही तुकड्या विनाअनुदानित आहेत. शाळेत एकूण 23 शिक्षक असून, त्यापैकी 15 शिक्षकांच्या वैयक्‍तिक मान्यता नाहीत. शाळेची लिपिक, सेवक पदे आणि अनुदान दुरुस्तीच्या प्रलंबित कामासाठी त्यांनी जिल्हा परिषदेत प्रस्ताव दाखल केलेला आहे. 

मात्र, त्यांना पाठपुरावा करणे शक्य नव्हते. त्यामुळे शाळेचे सेवक सुनील गोपाल चौधरी यांनी काम करून देण्यासाठी रामेश्‍वर कानघुले (रा. नेहरूनगर, शिवाजीनगर) याच्याशी रेखे आणि जोशी यांची ओळख करून दिली. आरोपी कानघुले यानेही मंत्रालयात मोठी ओळख असल्याच्या थापा मारून शिक्षकांच्या संच मान्यता मिळवून देतो, एका शिक्षकासाठी चार ते पाच लाख असे पंधरा शिक्षकांसाठी 75 ते 80 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अर्धे पैसे दिल्यास लगेचच जिल्हा परिषदेतून शिक्षक मान्यतेची कामे करून देतो, असे आमिष दाखवले. यानंतर शिपाई चौधरी यांनीही कानघुले काम करेल, असा विश्‍वास दाखविला. रेखे आणि जोशी यांनी शिक्षकांना ही माहिती दिली. शिक्षकांनी आपसात पैसे गोळा करून वेळोवेळी रेखे आणि जोशी आणि चौधरी यांच्या मध्यस्थीने कानघुले याला दिले. 

आर्थिक भुर्दंड शिक्षकांना

शंकरबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि कोषाध्यक्षांनी आरोपी रामेश्‍वर कानघुले यांच्याशी व्यवहार करून शिक्षकांकडून पैसे गोळा केले. ते त्याला पोहोचविले. यात त्यांचा विश्‍वासघात झाला, असे स्पष्ट होत असले तरी आर्थिक भुर्दंड हा शिक्षकांनाच सोसावा लागणार आहे. तसेच, सेवक चौधरी यांचीही यात महत्त्वाची भूमिका असून पोलिसांनी संशय व्यक्‍त केला आहे. ठरल्याप्रमाणे 19 सप्टेंबर 2015 ला 34 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर उर्वरित रक्‍कम वेळोवेळी पोचविली. मात्र, शिक्षकांच्या संच मान्यतेचे काम काही झाले नाही.