होमपेज › Aurangabad › तब्बल ६०५ अभ्यासक्रमांना शिक्षण शुल्कात सूट

तब्बल ६०५ अभ्यासक्रमांना शिक्षण शुल्कात सूट

Published On: Aug 05 2018 1:39AM | Last Updated: Aug 05 2018 1:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बी. ए. पासून एम. बी. बी. एस. पर्यंत तब्बल 605 अभ्यासक्रमांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना लागू आहे.याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 50 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी किंवा निर्धारित प्रक्रियेने प्रवेश मिळालेले आर्थिकद‍ृष्ट्या मागास (कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्याहून कमी) प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत. 

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर आर्थिकद‍ृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. अकृषी विद्यापीठे, शासकीय, शासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

तथापि, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्या तसेच खासगी अभिमत किंवा स्वयंअर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) शिक्षण शुल्काची ठरलेल्या प्रमाणानुसार रक्‍कम परत मिळते. 

बिगर व्यावसायिकला100 टक्के शिष्यवृत्ती

बी.ए., बी.कॉम. यासारख्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळेल. अकृषी विद्यापीठे, शासकीय, अशासकीय अनुदानित, अंशतः अनुदानित महाविद्यालये, तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील या विषयांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात पूर्ण सूट आहे.

शासकीय आणि अनुदानितमध्ये व्यावसायिकला 50 ते 100 टक्के ः व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटीद्वारे शासकीय व अनुदानित महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहे त्यांना शिक्षण शुल्कात 100 टक्के, तर अडीच ते आठ लाख यादरम्यान उत्पन्न असलेल्यांना 50 टक्के सवलत मिळेल. तथापि, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या (व्यवस्थापन कोटा वगळून) आर्थिकद‍ृष्ट्या मागास प्रवर्गातील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना 50 टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

शिष्यवृत्तीसाठी पात्र काही अभ्यासक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभाग ः बिगर व्यावसायिक (बी.ए., बी.कॉम. आदी), अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग, वास्तुशास्त्र आदी. वैद्यकीय शिक्षण ः एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए. एम.एस., बी.एच.एम.एस. व नर्सिंग आदी. कृषी शिक्षण ः कृषी व संलग्न विषय, फलोत्पादन, जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन. पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय ः प्राणिशास्त्र व पशुसंवर्धन, दुग्धतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान आदी.

एमबीबीएस, बीडीएससाठीही शिष्यवृत्ती ः शासकीय, अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांहून कमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्काच्या 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. पूर्वी वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये होती. यंदापासून ती आठ लाख रुपये करण्यात आली.