होमपेज › Aurangabad › वाळूजमध्ये उद्योगांचे 50 कोटींचे नुकसान

वाळूजमध्ये उद्योगांचे 50 कोटींचे नुकसान

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 11 2018 1:05AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी झालेल्या तोडफोडीत उद्योगांचे तब्बल 50 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मराठवाडा ऑटोक्‍लस्टरच्या सभागृहात शुक्रवारी (दि.10) झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. उद्योगांना यापुढे अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून, पोलिस आयुक्‍तांना तो सादर करण्यात आला.

‘सीआयआय’च्या मराठवाडा अध्यक्षा मोहिनी केळकर यांनी या प्रसंगी बोलताना प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. प्रशासन कमजोर असल्याने औरंगाबाद शहराचे मोठे नुकसान होत असून, उद्योगांवरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. राजकीय पक्षांनी उद्योगांमागे पाठबळ उभी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारची घटना हा औरंगाबादच्या औद्योगिक इतिहासातील काळा दिवस असल्याचे मसिआचे अध्यक्ष किशोर राठी यांनी सांगितले. 

दोनशे कोटींची गुंतवणूक हलविणार

नहार इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष नहार म्हणाले की, मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही कंपनी बंद ठेवली होती. मात्र, 50 ते 60 जणांचा जमाव चालून आला. इलेक्ट्रॉनिक दरवाजा उघडत नसल्याने दरवाजावरून उड्या घेत कंपनीत प्रवेश केला. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. आम्ही वाळूजमध्ये 200 कोटींची नवीन गुंतवणूक करून व्हेंबिल असेंब्ली या प्रकारातील काचांचे उत्पादन सुरू केले होते. आता ही गुंतवणूक इतरत्र हलविण्याचा गंभीरपणे विचार करीत आहोत.

60 टन पान्हे गायब

आकार टूल्समध्ये तयार करण्यात आलेले 60 टन पान्हे जमावाने लांबवल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तोडी यांनी केली. संमती फोर्ज कंपनीचेही मोठे नुकसान झाल्याचे व्यवस्थापकीय संचालक करण सारडा यांनी सांगितले. या प्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.