Fri, Mar 22, 2019 22:47होमपेज › Aurangabad › छावणीत चार दिवसांत गॅस्ट्रोचे ५० रुग्ण                      

छावणीत चार दिवसांत गॅस्ट्रोचे ५० रुग्ण                      

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:42AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

छावणीत गेल्या चार दिवसांत गॅस्ट्रोच्या 50 रुग्णांवर उपचार करण्यात आले. बुधवारी (दि.20) सातजण उपचारासाठी दाखल झाले. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने अभियंता विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची सायंकाळी उशिरापर्यंत झाडाझडती घेतली. गुरुवारी (दि. 21) स्वच्छता विभागाची चौकशी करण्यात येणार आहे.

छावणीत गेल्या महिन्यात 10 नोव्हेंबर रोजी दूषित पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे हजारो नागरिकांना पोटदुखी, मळमळ, वांत्या व जुलाब होण्यास सुरुवात झाली होती. गॅस्ट्रोमुळे हा प्रकार उद्भवल्याचे आढळून आले होते. गॅस्ट्रोची ही साथ सुमारे पंधरा दिवसांपर्यंत होती. मात्र त्यानंतर परिषदेने खाम नदीच्या नाल्यात तपासणी केल्यावर पाणीपुरवठा करणार्‍या पार्ईपलाईनमध्ये तीन लिकेज आढळून आले होते. परिषदेने ते दुरुस्त करून जलकुंभ व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली होती.

त्याशिवाय अनेकदा तपासणी करून खात्री केल्यावर नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात आला होता. काही दिवस सर्व ठीक असताना सात  डिसेंबरपासून पुन्हा गॅस्ट्रोची साथ सुरू झाली. या एकाच दिवशी सुमारे 50 रुग्ण छावणीच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर संख्या कमी झाली, मात्र रुग्ण येणे सुरूच होते. आता मात्र रविवारपासून पुन्हा दररोज गॅस्ट्रोचे रुग्ण येत आहेत. चार दिवसांत सुमारे 50 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर बुधवारीदेखील सात रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पाणीपुरवठा करणार्‍यांची अद्याप चौकशी झालेली नाही. त्यातच पुन्हा गॅस्ट्रोची साथ उद्भवून देखील सध्या प्रशासन मान्य करण्यास तयार दिसत नाही.

छावणी परिषदेच्या सभागृहात बुधवारी सकाळी दूषित पाणीपुरवठ्यास दोषी कोण याच्या चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. बुधवारी अभियंता विभागातील अधिकारी व कर्मचारी अशा सहा जणांची चौकशी करण्यात आली. गुरुवारी स्वच्छता विभागाची चौकशी करण्यात येणार आहे. डॉ. गीता मालू व डॉ. विनोद धामंदे यांनी गॅस्ट्रो झालेल्या रुग्णांची यादी चौकशी समितीसमोर सादर केली असल्याचे समितीचे अध्यक्ष व परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितले.