Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Aurangabad › आठ जणांची ४९ लाखांना फसवणूक करणारा जेरबंद

आठ जणांची ४९ लाखांना फसवणूक करणारा जेरबंद

Published On: Dec 16 2017 2:19AM | Last Updated: Dec 16 2017 2:19AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

हाऊसकीपिंगच्या व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून आठ जणांकडून 48 लाख 78 हजार रुपये उकळणार्‍या बिहारी आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुजरातेतून अटक केली. तीन दिवस सापळा रचून गुरुवारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सुरेंद्र परमानंद ऊर्फ बचनू झा (35, रा. शिवनगर घाट, जि. दरभंगा, बिहार, ह. मु. बापूनगर रोड, अहमदाबाद) असे आरोपीचे नाव असून प्रथमवर्ग न्या. ए. बी. शेख यांनी त्याला सोमवारपर्यंत (18 डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनेश राजेंद्र पाटील (रा. हर्सूल टी पॉइंट) यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. आरोपी सुरेंद्र झा याची एस. के. प्रोडक्ट नावाने हाऊसकीपिंग मालाची कंपनी होती. यात भागीदारी करण्याच्या नावाखाली त्याने धनेश पाटील यांच्याकडून अंदाजे 5 लाख 70 हजार रुपये घेतले. त्यानंतर सुदर्शन इंटरप्रायजेस नावाने करारनामा करून  तीन लाख 90 हजार रुपये उकळले. त्यानंतर आरोपी सुरेंद्र झा औरंगाबादेतून पळून गेला होता.  

कोणाकडून किती उकळले पैसे

आरोपी सुरेंद्र झा याने धनेश पाटील यांच्याकडून मोठी रक्‍कम उकळल्यानंतर त्याने अनेकांना असेच आमिष दाखवून गंडा घातला. त्याने शबाना शेख मजरउद्दीन यांच्याकडून तीन लाख, किरण कचरू डिके यांच्याकडून 5 लाख 68 हजार, त्रिरत्न गंगावणेंकडून 1 लाख 60 हजार, विशाल जोगदंडे 3 लाख 20 हजार रुपये, रोहित तायडे 1 लाख 10 हजार, राजेंद्र काळे 23 लाख, आर. डी. प्लास्ट यांच्याकडून 1 लाख 20 हजार, असे एकूण 38 लाख 78 हजार रुपये उकळले आणि सर्वांची फसवणूक केली, असे धनेश पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

गुजरातमध्येही थाटला होता धंदा

आरोपी सुरेंद्र झा मूळचा बिहारचा आहे. औरंगाबादेत अनेकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून 49 लाख रुपये हडपल्यानंतर त्याने येथून पोबारा केला होता. परंतु, तो पळून बिहारला न जाता गुजरातमध्ये गेला. तेथेही त्याने गुंतवणुकीचा व्यवसाय थाटला होता. व्हिजिटिंग कार्ड तयार करून लघु उद्योजकांना वाटले होते. परंतु, औरंगाबाद पोलिसांमुळे त्याच पितळ उघडे पडले. आर्थिक गुन्हे शाखेचे हवालदार अरुण वाघ, विलास कुलकर्णी, मनोज उईके, महेश उगले यांच्या पथकाने त्याला अटक केली.