Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Aurangabad › पंधरा दिवसांत ४८ शेतकर्‍यांनी गमावला जीव

पंधरा दिवसांत ४८ शेतकर्‍यांनी गमावला जीव

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:18AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

कर्जमाफीचा औटघटकेचा ठरलेला आनंद, महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी वीज कनेक्शन कपातीची कारवाई आणि त्यातच बोंडअळीने केलेला हल्ला अशा परिस्थितीत मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढली आहे. मागील पंधरा दिवसांत तब्बल 48 शेतकरी कुटुंबांनी घरातील कर्ता पुरुष गमावल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

ऐन दिवाळीत शासनाने कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकर्‍यांना नव्या कपड्यांसह कर्जमाफीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अद्यापही शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा कायम आहे. या धक्क्यातून सावरत नाही, तोच थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणने जोरात सुरू केली. कनेक्शन कपात करून वीजपुरवठा तोडल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी असूनही देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला. त्यातच खरिपात बहरलेले पांढरे सोने वेचण्यापूर्वीच बोंडअळीने हल्ला केला. मराठवाड्यात सुमारे 70 टक्के कापूस बोंडअळीने खाऊन टाकला आहे. कापसाच्या विक्रीतून येणार्‍या पैशांत कुटुंबासाठी केलेल्या नियोजनावर पाणी फेरले गेले आहे. सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली अडकला आहे. 

शेतकरी संघटनांसह विविध पक्ष-संघटनांनी ओरड केल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. पाहणी करण्याचे नाट्य सुरू झाले. शेतकर्‍यांकडून कापूस पिकाच्या पेरणीबाबत पुन्हा एकदा फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही सुरू करून कोरडा दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकारात हतबल झालेला शेतकरी गळ्याला फास लावत आहे. 20 नोव्हेंबर ते 4 मार्च या अवघ्या 15 दिवसांत मराठवाड्यात 48 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर मागील अकरा महिन्यांत मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा हजाराच्या दिशेने सरकला आहे.