Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    



होमपेज › Aurangabad › अबब! ४० कोटी हुंड्याची मागणी : विवाहितेचा छळ

अबब! ४० कोटी हुंड्याची मागणी : विवाहितेचा छळ

Published On: Jan 07 2018 7:32PM | Last Updated: Jan 07 2018 7:32PM

बुकमार्क करा




औरंगाबाद : प्रतिनिधी

व्यवसाय आणि वैयक्‍तिक खर्चासाठी हुंडा म्हणून ४० कोटीची मागणी करत, उद्योगपती कुटुंबीयांकडून विवाहितेचा छळ केल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे. या प्रकरणी चारित्र्यहनन, धक्‍काबुक्‍की करणे, तसेच नशेत विवाहितेला शिवीगाळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरुद्ध सातारा ठाण्यात ५ जानेवारी (शुक्रवारी)  गुन्हा नोंद करण्यात आला. गेली ७ वर्ष या विवाहितेवर अश्या प्रकारे अत्याचार सुरू असल्याचे या महिलेने तक्रारीत नोंद केली आहे.

अमित रमेश अहिरराव (पती), माधुरी रमेश अहिरराव (सासू) आणि रमेश केशव अहिरराव (सासरा, सर्व रा. रवीकिरण अपार्टमेंट, टिळकनगर) अशी गुन्हा नोंद झालेल्या सासरच्या संशयित आरोपींची नावे आहेत. अहिरराव कुटुंबाची अमित बिल्डर्स आणि सोनई कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाने बांधकाम कंपनी आहेत. ते शासकीय कंत्राटदार असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मैथिली हिचा अमितशी विवाह झाला होता. अमित याची अमित बिल्डर्स आणि सोनई कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाने बांधकाम कंपनी आहे. कंपनीच्या कामासाठी अमित यांने मैथिलीला घरच्याकडून ४० कोटी हुंड्याच्या स्वरूपात रक्कम आणण्याची मागणी केली. मैथीलीने आपल्या आई - वडिलाकडून आपण इतकी रक्कम आणू शकत नसल्याचे सांगितले. यावर अमित याने दारूच्या नशेत मैथीलीला शिवीगाळ करणे, मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे, व्यवसायासाठी म्हणून अनेकदा पैशांची मागणी केल्यावर मैथिलीच्या आई-वडिलांनी धनादेशाद्वारे 2 कोटी 90 लाख रुपये दिले. मात्र अहिरराव कुटुंबाकडून जादा पैशाच्या मागणीवरून मैथिलीला त्रास देणे चालूच ठेवले. या दांपत्यास सहा वर्षांचा मुलगा असून, तीन वर्षांची एक मुलगी देखील त्यांनी दत्तक घेतली आहे.

प्रत्येक वर्षी ३ कोटी आणण्याची मागणी...

आरोपी अमित अहिरराव याने पत्नी मैथिली यांना नांदायचे असेल तर प्रत्येक वर्षी 2 ते 3 कोटी रुपये आणण्याची मागणी केली, परिणाम छळ भोगण्यास तयार राहायचे, अशी धमकी दिली. यासर्व प्रकारनंतर मैथिली हिने महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार नोंदवली होते. यावेळी अमित यास समज देण्यात आला होता. मात्र, अमितच्या वर्तणुकीत काहीही फरक पडला नाही. त्यामुळे मैथिली यांनी अखेर पोलिसांत गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास हवालदार रमेश कंदे करीत आहेत.