Thu, Jul 18, 2019 04:35होमपेज › Aurangabad › पिंपळगावात साडेतीनशे कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

पिंपळगावात साडेतीनशे कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Published On: Feb 18 2018 10:26AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMपिंपळगाव गांगदेव : प्रतिनिधी

फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव येथील एका शेतकर्‍याच्या पोल्ट्री फार्ममधील 350 कोेंबड्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यामुळे या शेतकर्‍याचे 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे अधिकृत कारण कळाले नाही. कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे.

या घटनेची मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंपळगाव गांगदेव येथील शेतकरी साईनाथ काळे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुकूट पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी त्यांनी 1 लाख 50 हजार रुपये खर्च करून कोंबड्यांसाठी लोखंडी व पत्र्याचे शेड बांधले होते, तसेच पडेगाव येथून पाचशे कोंबड्यांचे पिलं आणून हा व्यवसाय त्यांनी चार महिन्यांपूर्वी सुरू केला होता. कोंबडीचे पिले, त्यांच्या खाद्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च करण्यात आला. चार महिने कोंबड्यांचा सांभाळ करून त्या आता विक्री लायक झाल्या होत्या, मात्र अचानकपणे या शेडमधील कोंबड्याचा गुरुवारी आणि शुक्रवारी तडफडून मृत्यू होण्यास प्रारंभ झाला. गेल्या दोन दिवसांत जवळपास 350 कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या शेतकर्‍याचे 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे अधिकृत कारण कळाले नाही.

दरम्यान, मृत कोंबड्याचे शवविच्छेदन धामणगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप खेसर यांनी केले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. याबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोंबड्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे. या शेतकर्‍यास शासनाने नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब काकडे यांनी केली आहे.