Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Aurangabad › कचरा अखेर चिकलठाण्यात 

कचरा अखेर चिकलठाण्यात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

चिकलठाण्यातील केंब्रिज स्कूलपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील सावंगी बायपासवरील मनपाच्या मालकीची 35 एकर जागा कचर्‍यासाठी निवडण्यात आली आहे. येथील पाच एकर जागेवर कंपोस्टिंग आणि कचर्‍यावर प्रोसेसिंग करण्यात येईल. आठवडाभराने तिथे कचरा नेण्यास सुरुवात केली जाईल. काही आधार नसताना विरोध केला जात असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. या जागेच्या आसपास वस्ती नाही, त्यामुळे विरोध करण्याचा प्रश्‍नच येत नाही. जाणूनबुजून त्रास दिला तर कारवाई करू, असा इशाराही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कचरा प्रक्रिया करण्यासाठी जागेचा निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने नियुक्‍त केलेल्या, विभागीय आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखालील कमिटीवर सोपवले होते. या निर्णयानंतर गुरुवारी सकाळी विभागीय आयुक्‍तालयात आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्‍त नवल किशोर राम यांच्यासह मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत जागेचा निर्णय घेण्यात आला.  सर्व पर्यायांवर विचार केल्यानंतर चिकलठाणा येथील 35 एकर जागा निवडण्यात आली आहे. पाच एकर जागेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांआधारे ओल्या कचर्‍याचे कंपोस्टिंग आणि सुक्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येईल.

शहरातील सुमारे 20 टक्के भागात कचर्‍याचे वर्गीकरण होत नाही. हा कचरा तिथे नेण्यात येईल. शहरातील विविध झोनमध्ये  गेल्या काही आठवड्यांपासून सुरू केलेले वर्गीकरण आणि कंपोस्टिंगची प्रक्रिया सुरूच राहील. ज्या झोनमध्ये जागेअभावी कचर्‍यावर प्रक्रिया करू शकलो नाही, अशा भागातील कचरा तिथे नेण्यात येईल. पाच एकर जागेपैकी 3 एकर ओल्या आणि 2 एकर जागा सुक्या कचर्‍यावर प्रक्रियेसाठी वापरण्यात येईल. उद्यापासूनच शेड व इतर बांधकाम करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले असून, 7 दिवसांच्या आत हे काम पूर्ण होईल व तिथे कचरा नेला जाईल, असे राम यांनी सांगितले.  जुनी जागा वापरायची असेल तर याचिकाकर्ते व समोरच्या लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे न्यायालयाने सांगितलेले आहे. त्यामुळे कोणती जागा निवडायची, हा विचाराधीन निर्णय आहे. विकेंद्रीकरण पद्धतीने कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे काम झालेच पाहिजे. जागेची अडचण कोणकोणत्या ठिकाणी आहे, त्यासाठी काय केले पाहिजे, याचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ. भापकर म्हणाले. ज्या झोनमध्ये जागेची अडचण आहे तिथला कचरा वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा शोधणे सुरू आहे. डंपिंगचा आता मुद्दाच राहिलेला नाही, असेही डॉ. भापकर यांनी स्पष्ट केले.

दुग्धनगरीऐवजी कचरा प्रकल्प : चिकलठाण्यातील गट नंबर 231 मधील 35 एकर जागा शासनाने काही वर्षांपूर्वी मनपाला दिली होती. मनपा या ठिकाणी शहरातील सर्व गोठे तिकडे नेणार होती. त्यामुळे या जागेवर दुग्धनगरी उभारण्यासाठी ही जागा मनपाला शासनाने दिलेली आहे. मात्र शहरातील गोठे हलवणे मनपाकडून शक्य झाले नाही. त्यामुळे ही जागा तशीच पडून राहिली. या जागेवर अतिक्रमण करून काही लोकांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे. ही जागा मोजणी करून ताब्यात घेणार, सर्व जागेला फेन्सिंग करून घेणार आहे. सगळी प्रक्रिया कंपोस्टिंगद्वारे होणार आहे. आधी शेड व इतर कामे झाल्यानंतरच कचरा नेला जाईल. कारण नसताना लोक विरोध करतात, ज्यांचे घर 10 किलोमीटरवर आहे तेही अडून बसतात. अतिक्रमण जास्त असलेल्या भागातूनच विरोध जास्त होतो, हे दिसून आले आहे. मात्र हे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने कमिटीला अधिकार दिल्याने आम्हाला सपोर्ट आहे.


  •