Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Aurangabad › ‘फिनॉमिनल’विरुद्ध  आणखी ३०० तक्रारी 

‘फिनॉमिनल’विरुद्ध  आणखी ३०० तक्रारी 

Published On: Jun 01 2018 1:56AM | Last Updated: Jun 01 2018 12:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हेल्थ पॉलिसीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून दुप्पट परतावा आणि विम्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांना गंडा घालणार्‍या मुंबईच्या फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिस लि. कंपनीविरुद्ध आणखी 300 जणांनी पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी 96 तक्रारदारांनी उस्मानपुरा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. सर्वसामान्यांच्या फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, 2005 पूर्वी उस्मानपुर्‍यातील ज्योतीनगर येथे फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिस लि. मुंबई या कंपनीचे ऑफिस सुरू करण्यात आले होते. त्यांनी नागरिकांशी संपर्क वाढवून अगोदर विश्‍वास संपादन केला. नंतर त्यांना हेल्थ पॉलिसीचे वेगवेगळे प्लॅन समजावून सांगितले. सात वर्षे, पंधरा वर्षे गुंतवणुकीनंतर दुप्पट परतावा सोबत मोफत वैद्यकीय उपचार आणि विमा कवच अशी आमिषे दाखवून या कंपनीने जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक पुंजीवर डल्ला मारला. दरम्यान, अनेकांच्या प्लॅनची मुदत पूर्ण झाल्यानंतरही त्यांना गुंतविलेल्या रकमेचा परतावा मिळाला नाही. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कार्यालयात चकरा मारण्यास सुरुवात केली. ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात आल्यावर फिनॉमिनल कंपनीने गाशा गुंडाळला. त्यामुळे गुंतवणूकदार पोलिसांत धावले. 

या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला 96 तक्रारदार समोर आले होते. आता हा आकडा तब्बल 300 पर्यंत वाढला आहे. आणखी तक्रारदार येण्याची शक्यता आहे.  

लातूरकरांनाही गंडविले

फनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिस लि. मुंबई या कंपनीने संपूर्ण राज्यात शाखा सुरू केल्या होत्या. विविध जिल्ह्यांत कार्यालये सुरू करून एजंट नेमले. त्यांच्यामार्फत गुंतवणूकदारांपर्यंत पोचलेल्या या कंपनीने लातुरातही अनेकांना गंडविले आहे. या कंपनीविरुद्ध लातूरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.