Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Aurangabad › तीनशे विशेष पोलिस अधिकारी बडतर्फ

तीनशे विशेष पोलिस अधिकारी बडतर्फ

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 1:28AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

पुंडलिकनगर येथे पोलिस आयुक्‍तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारालाच दांडी मारणार्‍या तीनशे विशेष पोलिस अधिकार्‍यांना (एसपीओ) पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी तडकाफडकी बडतर्फ केले. यापुढे चांगले काम न करणार्‍या एसपीओंवर अशीच कारवाई करण्याचा इशाराही पोलिस आयुक्तांनी दिला.

शुक्रवारी पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांसाठी येथील तिरुमाला मंगलकार्यालयात पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांचा जनता दरबार दुपारी आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबाराला आमदार अतुल सावे, माजी महापौर भगवान घडामोडे, पोलिस उपायुक्‍त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त गायकवाड, मुकुंदवाडीचे पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जनता दरबार सुरू होताच पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी विशेष पोलिस अधिकार्‍यांमुळे शहरातील गुन्हेगारीला कसा आळा बसत आहे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळीच त्यांनी पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत किती एसपीओ नियुक्‍त केले आहेत? अशी विचारणा संबंधित पोलिस अधिकार्‍यांना केली. त्यावर अधिकार्‍यांनी दोन्ही हद्दीत चारशे एसपीओ असल्याचा खुलासा केला. मग या जनता दरबाराला किती जण उपस्थित राहिले, अशी विचारणा आयुक्‍तांनी केली असता केवळ शंभर एसपीओच हजर असून तीनशे जणांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याचे त्यांना समजले. हे ऐकून पोलिस आयुक्‍त भडकले. एसपीओंचा हा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. त्यांनी जनता दरबारसारख्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे होते. जे तीनशे जण उपस्थित नाहीत त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात येत असल्याचे त्यांनी तेथेच घोषित केले. यापुढे एसपीओंचा असा हजगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जे एसपीओ चांगले काम करतील त्यांना भरघोस बक्षिसे देण्यात येतील मात्र जे हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी नागरिकांनी आपल्या अनेक अडीअडचणी आणि समस्या पोलिस आयुक्‍तांसमोर मांडल्या. त्याचे तत्काळ निराकरणही करण्यात आले.