Thu, Jun 20, 2019 01:38होमपेज › Aurangabad › सौभाग्य योजनेत २३ हजार बनावट ग्राहक

सौभाग्य योजनेत २३ हजार बनावट ग्राहक

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMऔरंगाबाद : जे. ई. देशकर

सौभाग्य योजनेच्या यादीत महावितरणच्या काही कर्मचार्‍यांनी मर्जीतील व्यक्‍तींची नावे घुसडल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद परिमंडळातील तब्बल 23 हजार अपात्र ग्राहकांना अखेर वगळण्यात आले असून, इतरांना 15 ऑगस्टपर्यंत वीज जोडणी देण्याचे प्रयत्न केले जात आहे. 

गरीब जनतेच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी पंतप्रधान सौभाग्य योजना राबवण्यात येत आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील 192 खेड्यांचा समावेश असून औरंगाबाद परिमंडळातील 64 हजार घरांत वीजपुरवठा द्यायचा आहे. परिमंडळातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यात 55 हजार 154 ग्राहकांची तपासणी करून याद्या तयार करण्यात आल्या. त्यानुसार पात्र ठरलेल्या औैरंगाबाद जिल्ह्यात 28 हजार व जालना जिल्ह्यात 36 हजार घरांत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत स्ट्रक्‍चर तयार असणार्‍या ठिकाणी जोडणी देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणोरकर यांनी दिली.  

बिल बुडवे, मृतांची नावे

योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करताना हजारो ग्राहक अपात्र असल्याचे दिसून आले. वीज जोडणी असणार्‍यांचाही यादीत समावेश होता. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्यांची नावेही आहेत. काही लाभार्थी शेतवस्तीवरील ग्राहक असून, दिलेल्या पत्त्यावर त्यांचा ठावठिकाणाच लागत नाही, तर काही ग्राहक चक्‍क मृत आहेत. अशी बोगस नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. 

आजघडीला 25 हजार ग्राहकांना तातडीने वीज कनेक्शन देण्यासाठी स्ट्रक्‍चर तयार आहे. यापैकी 8 हजार 856 ग्राहकांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. उरलेल्या 16 हजार 530 ग्राहकांना 15 ऑगस्टपर्यंत कनेक्शन देण्यात येणार आहे, तर उरलेल्या ग्राहकांना डीपी, विद्युत पोल, व इतर साहित्य उपलब्ध झाल्यानंतर वीज कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहितीही गणेशकर यांनी दिली.